logo

Organic Inorganic

सुक्ष्मजीवांचा वापर करुन पिकासाठी गरजेच्या अन्नद्रव्यांची उपल्बधता वाढविणे आणि रासायनिक आम्लांच्या व्दारे वाढविणे, ह्यात ज मुलभुत फरक आहे, त ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत.

सुक्ष्मजीव हे वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय आम्ले स्रवतात ज्यामुळे पिकासाठी गरजेची असलेली अन्नद्रव्ये मुक्त होवुन पिकास उपलब्ध होतात, तसेच ह्या सेंद्रिय आम्लांमुळे मातीचा सामु कमी होवुन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते हे आपण आता जाणतोच.

रॉक फॉस्फेट पासुन, फॉस्फेट युक्त खते तयार करतांना त्यात सल्फ्युरिक असिड चा वापर केला जातो हे देखिल आपण बघितले आहे. असिडच्या अशा प्रकारच्या प्रक्रियेमुळे रॉक फॉस्फेट मधिल फॉस्फरस हा फॉस्फरिक असिड मध्ये रुपांतरीत होतो, अर्थात हे सरळ फॉस्फोरिक असिड नसुन ते कॅल्शियम सोबत असलेले एक संयुग असते.

क्लिष्ट घटकांवर आम्लांची म्हणजेच असिडची प्रक्रिया करुन अशा प्रकारे जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये असलेली खते तयार करुन ती पिकासाठी वापरली जात असतात. हि प्रक्रिया सल्फ्युरिक असिड, हायड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, फॉस्फोरिक असिड वापरुन केली जाते ती जास्त वेगात, आणि कमी वेळेत होत असते. स्फुरद विरघळणारे जीवाणू मातीत रॉक फॉस्फेट टाकल्यानंतर शेतात देखिल करण्याची क्षमता बाळगुन असतात. ह्या जीवाणूंव्दारे स्रवण्यात आलेली सेंद्रिय आम्ले (ऑरगॅनिक असिड) रॉक फॉस्फेट वर प्रक्रिया करुन पिकास उपलब्ध होईल अशा फॉस्फोरस ची निर्मिती करतात. हि क्रिया सावकाश आणि कमी प्रमाणात होत असते.

रासायनिक पध्दतीत वापरली जाणारी सर्व आम्ले हि ईनऑरगॅनिक म्हणजेच असेंद्रिय असतात. ज्यात त्यांच्यात असलेला हायड्रोजन आयन, ज्याच्या प्रमाणावर माती, पाणी ह्यांची आम्लता आणि विम्लता (सामु) मोजली जात असते, ते हायड्रोजन आयन हे पुर्णतः मुक्त होवु शकतील अशा स्वरुपात असतात.

उदाहरणच द्यायचे झाले तर, सल्फ्युरिक असिड (H2SO4) मधिल हायड्रोजन हा १००% आयन च्या स्वरुपात असल्याने, सल्फ्युरिक असिड पाण्यात एकत्र केल्यानंतर जास्त प्रमाणात आम्लता वाढते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सल्फ्युरिक असिड पाण्यात टाकल्यानंतर हायड्रोजन (H2) आणि सल्फेट (SO4) पुर्णपणे वेगळे होतात. यातील हायड्रोजन हा पुर्णपणे आयन स्वरुपात असल्या कारणाने पाण्याचा सामु अत्यंत कमी होतो. त्यामुळे सल्फ्युरिक असिड हे अत्यंत शक्तीशाली असे असिड आहे. मातीचा सामु हा त्यात असलेल्या मुक्त हायड्रोजन आयन्स च्या प्रमाणावर असतो. त्यामुळे जितक्या जास्त प्रमाणात हायड्रोजन आयन तितका कमी सामु असे असते.

H2SO4 -> H2 (100% Ionic present as H+) + SO4 2-

सल्फ्युरिक असिड मधुन मोकळा झालेला हायड्रोजन आयन हा, मातीवरिल कॅटायन एक्सचेंज साईट वरिल जागा घेण्यास तयार असल्या कारणाने, आणि मातीतील मुक्त हायड्रजन आयन चे प्रमाण वाढवुन सामु कमी करु शकत असल्या कारणाने, मातीच्या कणांवरिल धनभार असलेले अन्नद्रव्य मोकळे होवुन पाण्यात विरघळतात आणि पिकास उपलब्ध होतात. तसेच आपण आधी जे राखिव दळ, अतिक्रमण, आणि अनैतिक घरोबा हे सगळे बघितले ते देखिल होते, आणि हे सगळे अवांतर उद्योग कुठेतरी घातक ठरतात.

हि अभिक्रिया अत्यंत वेगात आणि कमी कालवधीत होत असते. शिवाय ह्या अभिक्रियेत तयार होणारे ईतर पदार्थ जे आपण विस्तृत स्वरुपात पुढे बघणार आहोतच, ते विरघळवण्यासाठी पुन्हा रासायनिक असिड चा वापर करावा लागतो.

सुक्ष्मजीव जे आम्ल स्रवतात ते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन च्या रेणुंपासुन तयार झालेले असल्याने ते ऑरगॅनिक असिड म्हणजेच सेंद्रिय आम्ल असतात. सेंद्रिय आम्लाचे उत्तम उदाहरण म्हणजे सायट्रिक असिड. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक सायट्रिक असिड चा वापर हा फवारणीसाठी ज्यावेळेस पाणी वापरले जाणार असते, त्या पाण्याचा सामु कमी करण्यासाठी वापरतात. सायट्रिक असिड हे एक सेंद्रिय आम्ल आहे, आणि ज्यावेळेस ह्याचा वापर पाण्याचा सामु कमी करण्यासाठी केला जात असतो, त्यावेळेस त्याचा वापर केल्यानंतर पाण्यात असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियम च्या क्षारांचे एका स्वरुपातुन दुस-या स्वरुपात एखादे नविन संयुन तयार होत नाही. सायट्रिक असिड पाण्यात असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि सोडियम च्या बायकार्बोनेट सोबतच्या संगुयास सामु कमी करुन वेगवेगळे करते, ज्यामुळे मुक्त झालेल्या बायकार्बोनेट पासुन कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी तयार होते. मुक्त झालेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियम चे चिलेशन करुन, कॅल्शियम सायट्रेट, मॅग्नेशियम सायट्रेट, सोडियम सायट्रेट असे चिलेट तयार करते. चिलेशन झाल्यामुळे हे घटक पुन्हा नविन संयुग तयार करु शकत नाहीत. हे घटक पाण्यात कमी प्रमाणात विरघळत असल्या कारणाने, ते पाण्यातुन बाहेर निघणे देखिल शक्य होते. सेंद्रिय आम्लांसोबत अशा प्रकारे चिलेशन झालेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम हे पिकास देखिल शोषुन घेता येतात हे विशेष करुन नोंद करावे. (सोडियम देखिल पिकासाठी काही प्रमाणात गरजेचा असतोच)

सल्फ्युरिक असिड, फॉस्फोरिक असिड, नायट्रिक असिड हे पाण्याचा सामु कमी करण्यासाठी वापरले असता, ते पाण्यातील विविध क्षारांसोबतच संयुग पावुन एखादा नविनच पदार्थ तयार करतात. ह्या कारणामुळेच, खते आणि फवारणीची औषधे वापरत असतांना, पाण्याचा सामु कमी करण्यासाठी सेंद्रिय असलेले सायट्रिक असिड महत्वाचे ठरते.

सेंद्रिय आम्लांव्दारे केली जाणारी हि प्रक्रिया अत्यंत सावकाश अशी असते. सेंद्रिय आम्लांची तीव्रता ही रासायनिक आम्लांपेक्षा कमी असल्या कारणाने त्यांचे प्रमाण देखिल जास्त लागते. आपण जमिनीवर सल्फ्युरिक असिड किंवा फॉस्फोरिक असिड टाकल्यानंतर ज्या पध्दतीने फसफसुन येते त्यावरुन त्यांची तीव्रता लक्षात येते. जर सायट्रिक असिड चे अशा प्रकारचे द्रावण मातीवर टाकल्यानंतर फसफसुन येत नाही. ह्या वरुन दोन्ही प्रकारच्या असिड च्या तीव्रतेची कल्पना येते.

रासयनिक आम्ले (ईनऑरगॅनिक असिड)

शेतकरी आणि सल्लागार आज अनेक ठिकाणी सल्फ्युरिक असिड, फॉस्फोरिक असिड चा वापर करतांना दिसुन येतात. हा वापर का करावा ह्या बाबातीत अनेकांच्या (माझ्या देखिल) मनात हा प्रश्न नक्कीच आहे, की असिड वापरल्यानेज मिन खराब होणार तर नाही? हे असिड नेमके अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी का वापरायचे? आणि ह्या असिड मध्ये असलेली अन्नद्रव्ये पिकास मिळत असतिलच का?

आपण याठिकाणी कोणत्याही निष्कर्षावर पोहचुन एक निर्णय देण्यासाठी हे प्रकरण ह्या पुस्तकात घातलेले नाही. मी आधी देखिल अनेक वेळेस उल्लेख केला आहे, की, रासायनिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक अशा सर्वच प्रकारच्या उत्पादनांत कोणीच १००% योग्य किंवा वाईट नाही. शिवाय शेती हा हार-जीत चे युध्द नाही. मी बरोबर आणि हे असिड वापरणारे चुकिचे, किंवा असिड वापरणारे बरोबर आणि माझी जैविक उत्पादनांबाबतची आस्था चुकिची असा हा लढा नाही. आपण जर हा लढा समजत असाल तर ती चुक असेल. आपण पुस्तकाच्या सुरवातीलाच उल्लेख केला आहे की, शेती हे असे क्षेत्र आहे, ज्यात एकाच समस्येची अनेक उत्तरे असुन देखिल ती, सर्वच्या सर्व उत्तरे बरोबर असतात. एक शेतकरी म्हणुन किंवा कृषी सल्लागार, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी सेवा केंद्राचे मालक म्हणुन आपण नेमका तो पर्याय निवडायचा असतो, जो शेती आणि शेतकरी ह्या दोघांना फायदेशीर ठरेल. ज्यात शाश्वतता असेल, आणि तो नविन कोणतीही समस्या निर्माण करणार नाही. तेव्हा ह्या ठिकाणी आपण रासायनिक आम्ल आणि सेंद्रिय आम्ले ह्या दोघांचे गुणधर्म जाणुन घेणार आहोत. स्वामी विवेकानंद म्हणतात , अभिक्रिया घडण्यासाठीची सर्व रसायने एकत्र करुन ठेवली की, जी अभिक्रिया घडायची ती घडतेच. तेव्हा ह्या दोघांचे गुणधर्म जाणुन घेतल्यानंतर, वाचकांच्या मनातुन जो कौल येईल तो सर्वस्वी त्यांच्या वयैक्तिक मतावर अवलंबुन असा राहणार आहे. मी येथे केवळ सत्यता समोर मांडण्याचा प्रयत्न करुन, दोन्ही बाजुंना व्यासपिठ मिळवुन देण्याचे कार्य तेवढे करणार आहे.

तेव्हा आपण आता सल्फ्युरिक असिड आणि फॉस्फोरिक असिड वापरणार आहोत. जमिनीत सध्या दोन्ही असिड चा वापर भरपुर प्रमाणात वाढला आहे. द्राक्ष शेतक-यांनी सुरु केलेली हि पध्दत आता, डाळिंब, केळी ह्या पिकात देखिल वापरली जात आहे. काही ठिकाणी तर कापुस, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची पिकात देखिल ह्यांचा वापर होतांना दिसुन येतो आहे.

आपण ह्या दोन्ही असिडच्या वापरानंतर मातीत असलेल्या घटकांवर काय परिणाम होतो ते बघणार आहोत.

मातीत असलेल्या कॅल्शियम सोबत स्थिर झालेला फॉस्फोरस म्हणजेच ट्राय कॅल्शियम फॉस्फेट (Ca3(PO4)2 ) ची सल्फ्युरिक असिड (H2SO4) सोबत कशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया होते ते पुढील प्रमाणे -

Ca3(PO4)2 (मातीत स्थिर झालेला स्फुरद) + 2 H2SO4 (सल्फ्युरिक असिड) => Ca(H2PO4)2 (कॅल्शियम डाय हायड्रोजन फॉस्फेट – सिंगल सुपर फॉस्फेट) + 2 CaSO4 (कॅल्शियम सल्फेट – जिप्सम)

वरिल अभिक्रियेत तयार झालेला सिंगल सुपर फॉस्फेट सल्फ्युरिक असिड सोबत अभिक्रिया होवुन कॅल्शियम सल्फेट आणि फॉस्फोरिक असिड तयार होते.

Ca(H2PO4)2 + H2SO4 = CaSO4 + 2 H3PO4

(सिंगल सुपर फॉस्फेट) (सल्फ्प्युरिक असिड) (कॅल्शियम सल्फेट) फॉस्फोरिक असिड)

त्याच प्रमाणे ट्राय कॅल्शियम फॉस्फेट हा पाण्यात अत्यंत कमी प्रमाणात विरघळुन (०.००२ ग्रॅम प्रती लि.) त्यापासुन फॉस्फोरिक असिड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच चुना (लाईम) तयार होते. तसेच जमिनीत आधीपासुन असलेल्या चुन्यासोबत कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया होते ते आपण बघुया.

Ca3(PO4)2 (ट्राय कॅल्शियम फॉस्फेट) + 6H2O (पाणी) => 3 Ca(OH)2 (कॅल्शियम हायड्रॉक्साईड) + 2 H3PO4 (फॉस्फोरिक असिड)

मातीत तयार झालेला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच चुना हा पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो (१.७६ ग्रॅम प्रती लिटर) त्यामुळे तयार झालेला हा चुना विरघळवण्यासाठी पुन्हा सल्फ्युरिक असिड किंवा फॉस्फोरिक असिड चा वापर करावा लागतो. ह्या पैकि फॉस्फोरिक असिड सोबत अभिक्रिया होवुन पुन्हा डाय कॅल्शियम फॉस्फेटच तयार होणार असते, ज्याची रासायनिक अभिक्रिया पुढे आपण बघणार आहोत.

कॅल्शियम हायड्रॉक्साईड ची सल्फ्युरिक असिड सोबत अभिक्रीया होवुन कॅल्शियम सल्फेट तयार होते. या आधी देखिल ट्राय कॅल्शियम फॉस्फेट सोबत सल्फ्युरिक असिड ची अभिक्रिया होवुन कॅल्शियम सल्फेट तयार होते हे आपण बघितले आहेच.

Ca(OH)2 + H2SO4 = CaSO4 + H2O

कॅल्शियम सल्फेट हे जेव्हा पाण्याच्या दोन रेणुंसोबत असते तेव्हा ते असते जिप्सम (CaSO4.2H2O).

मातीत तयार झालेला जिप्सम हा पाण्यात विरघळुन वाहुन जात नाही. जिप्सम मधिल कॅल्शियम हा मातीच्या कणांना चिकटेलेल्या सोडियम जी जागा घेवुन, मातीचा सामु कमी करण्यास मदत करतो. मुक्त झालेला सोडियम हा सल्फेट सोबत अभिक्रिया होवुन, सोडियम सल्फेट तयार होते, जे पाण्यात विरघळुन, जमिनीत खोलवर वाहुन नेता येते. ज्या जमिनीत सोडीयम चे प्रमाण जास्त असते अशाच जमिनीत जिप्सम पासुन फायदा होत असतो,

जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत पाणी नसते (CaSO4. 0.5H2O) तेव्हा ते बनते प्लास्टर ऑफ पॅरिस. सल्फ्युरिक असिड हे अत्यंत प्रबळ असे पाणी नष्ट करणारे आम्ल असल्या कारणाने त्याच्या उपस्थितीत पाण्याचे रेणु कमी होतात हे विषेश करुन नुमद करावे. या अभिक्रियेत प्लास्टर ऑफ पॅरिस तयार होते किंवा नाही हा अभ्यासाचा आणि तसा नसला तरी वादाचा विषय नक्किच असणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस हे कॅल्शियम सल्फेट ला उष्णता देवुन म्हणजेच तापवुन तयार केले जाते हे मात्र नक्की, तेव्हा माती तापत असतांना काय होत असेल ही माहीती असल्यास पुरेसे ठरेल. ज्या वेळेस पिकास वरुन जिप्सम चा वापर करण्याची शिफारस केली जाते त्यावेळेस देखिल अशाच प्रकारची अभिक्रिया होत असेल. त्यामुळे सल्फ्युरिक असिड आणि जिप्सम वापरायचेच असेल तर त्यांच्या वापरानंतर भरपुर प्रमाणात पाणी वापरणे हे गरजेचे आहे. तरच त्यापासुन जास्त फायदा मिळेल, अन्यथा शक्यतांच्या जाळ्यात गुंतुन राहण्याचीच शक्यता जास्त.

सर्वच रासायनिक अभिक्रियात जमिनीत कॅल्शियम सोबत स्थिर झालेल्या फॉस्फोरस च्या ट्राय कॅल्शियम फॉस्फेट, डाय कॅल्शियम फॉस्फेट ह्या दोन्ही स्वरुपांची आणि सिंगल सुपर फॉस्फेट ची सल्फ्युरिक असिड सोबत काय अभिक्रिया होत असेल हे आपण बघितले. ह्या अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया हि जमिनीत जितक्या संभवतः प्रकारे होणे शक्य आहे, ते या ठिकाणी देण्यात आले आहे.

आता पर्यंत आपण बघितलेल्या अभिक्रियांत फॉस्फोरिक असिड तयार होतांना आपण बघितले आहे, ह्या तयार झालेल्या आणि जमिनीत बाहेरुन टाकण्यात आलेल्या फॉस्फोरिक असिड चे काय होत असेल ते आता बघुया

जमिनीत स्थिर स्वरुपात असलेला ट्राय कॅल्शियम फॉस्फेट च्या स्वरुपातील स्फुरद जेव्हा फॉस्फोरिक असिड सोबत अभिक्रिया होतो तेव्हा काय होते ते बघुया

Ca3(PO4)2 + 4 H3PO4 = 3 Ca(H2PO4)2

(कॅल्शियम डाय हायड्रोजन फॉस्फेट – सिगल सुपर फॉस्फेट),

पाण्यात विरघळल्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट चे विघटन होवुन कॅल्शियम आणि फॉस्फोरिक असिड तयार होते. ह्यापैकी पिकास मिळेल ईतका फॉस्फोरस वगळुन जितका फॉस्फोरस शिल्लक राहतो, तो पुन्हा मातीत असलेल्या कॅल्शियम, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम बाय कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत पुन्हा स्थिर स्वरुपात रुपांतरीत होत असतो. पिकास मुळांच्या अगदी जवळ असलेला फॉस्फोरस उचलुन घेता येतो

फॉस्फोरिक असिड मातीत असलेल्या कॅल्शियमच्या विविध स्वरुपांसोबत कशा प्रकारे अभिक्रिया होत असेल ते बघुया

चुन्या सोबत

कॅल्शियम हायड्रॉक्साईड ची फॉस्फोरिक असिड सोबत अभिक्रिया होवुन डाय कॅल्शियम फॉस्फेट तयार होते. डाय कॅल्शियम फॉस्फेट हा पाण्यात अत्यंत कमी प्रमाणात विरघळत असल्या कारणाने पुन्हा सल्फ्युरिक असिड चा वापर करावा लागतो, ज्यामुळे कॅल्शियम सल्फेट तयार होते.

Ca(OH)2 + H3PO4 = CaHPO4 + 2 H2O

(कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच चुना) + (फॉस्फोरिक असिड) = डाय कॅल्शियम फॉस्फेट + पाणी जर फॉस्फोरिक असिड चा वापर चुना असलेल्या जमिनीत केला तर त्यामुळे डाय कॅल्शियम फॉस्फेट तयार होते, जे की, फॉस्फोरस चे स्थिर स्वरुप आहे.

Ca(OH)2 + H3PO4 => CaHPO4 + 2 H2O (स्थिर स्वरुप तयार होते)

(कॅल्शियम हायड्रॉक्साईड –चुना) + (फॉस्फोरिक असिड) = डाय कॅल्शियम फॉस्फेट + पाणी

ट्राय कॅल्शियम फॉस्फेट सोबत

Ca3(PO4)2 + 4 H3PO4 = 3 Ca(H2PO4)2

(कॅल्शियम डाय हायड्रोजन फॉस्फेट – सिगल सुपर फॉस्फेट) (पिकास उपलब्ध स्वरुप तयार होते.)

मुक्त कॅल्शियम सोबत

3 Ca + 2 H3PO4 = Ca3(PO4)2 (ट्राय कॅल्शियम फॉस्फेट) + 3 H2 (स्थिर स्वरुप तयार होते)

त्याच प्रमाणे मुक्त कॅल्शियम सोबत स्थिरिकरण होवुन डाय कॅल्शियम फॉस्फेट देखिल तयार होत असते.

कॅल्शियम कार्बोनेट सोबत

3 CaCO3 + 2 H3PO4 = Ca3(PO4)2 + 3 H2CO3 (ट्राय कॅल्शियम फॉस्फेट स्थिर स्वरुप तयार होते)

3 CaCO3 + 2 H3PO4 = 3 CO2 + Ca3(PO4)2 + 3 H2O (ट्राय कॅल्शियम फॉस्फेट स्थिर स्वरुप तयार होते)

सेंद्रिय आम्ल

आपण आता पर्यंत ज्या रासायनिक अभिक्रिया बघितल्यात त्या सर्व ईनऑरगॅनिक रसायनशास्रातील होत्या. ह्यात कोणते तरी दोन किंवा अधिक रसायने एकत्र केल्यानंतर एखादा नविन घटक तयार होत होता. ह्या अभिक्रिया अत्यंत कमी वेळेत आणि वेगाने घडत असतात.

सुक्ष्मजीवांच्या व्दारा स्रवल्या जाणा-या आम्लांचा समावेश हा (ऑरगॅनिक केमिस्ट्रि) सेंद्रिय रसायनशास्रात होतो. सुक्ष्मजीवांच्या व्दारा स्व्रवल्या गेलेल्या आम्लांत कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या तिघांचा समावेश असल्याने ते सेंद्रिय आम्ल म्हणुन ओळखले जातात.

ज्यावेळेस जमिनीत हे असिड सुक्ष्मजीवांव्दारा स्रवले जातात, त्यावेळेस जीवाच्या सभोवतली असलेल्या पाण्यात हे असिड विरघळतात, मात्र त्यातील पुर्ण हायड्रोजन हा आयन स्वरुपात नसल्याने त्यातील काही भाग हा पाण्यात मुक्त अशा हायड्रोजन आयन च्या स्वरुपात जावुन सामु कमी करतो. सामु कमी झाल्याने, जमिनीत स्थिर झालेल्या तसेच मातीच्या कणांत असलेल्या अन्नघटकांना मोकळे करुन पिकास उपलब्ध होतील अशा स्वरुपात रुपांतरीत करण्याचे कार्य सहज रित्या मात्र सावकाश होते. हिच क्रिया रसायनांव्दारे वेगात होते, मात्र, उपलब्ध स्वरुपात रुपांतरीत झालेले घटक पुन्हा नविन घटकांच्या निर्मितीसाठी सज्ज होतात.

सेंद्रिय आम्ल त्यांच्या संपर्कात येणा-या धनभार असलेल्या घटकांचे चिलेशन करुन त्यांना ईतर कोणत्याही घटकासोबत नव्याने अभिक्रिया करुन एखादा पिकास उपलब्ध होणार नाही असा नविन पदार्थ तयार करण्यापासुन थांबवुन ठेवतात.

समजा मातीत चुन्याचे प्रमाण जास्त आहे, त्यावर सल्फ्युरिक असिड किंवा फॉस्फोरिक असिड ची प्रक्रिया केल्यानंतर चुन्याचे रुपांतर नविन कोणत्यातरी पदार्थात होवुन एक नविन समस्या निर्माण होत असते. आपण बघितलेच आहे कि, चुन्याची सल्फ्युरिक असिड सोबत अभिक्रिया होवुन कॅल्शियम सल्फेट तयार होते आणि फॉस्फोरिक असिड सोबत अभिक्रिया होवुन कॅल्शियम डाय फॉस्फेट तयार होते. हि दोन्ही नव्याने तयार झालेली रसायने पाण्यात अत्यंत कमी प्रमाणात विरघळतात आणि पिकास होणारी अन्नद्रव्यांची उपलब्धता देखिल कमी होते.

मात्र ह्याच चुन्यावर जर सायट्रिक असिड ह्या सेंद्रिया आम्लाची प्रक्रिया झाली तर मात्र, कॅल्शियम सायट्रेट हे एक नविन चिलेटेड रसायन तयार होते. कॅल्शियम चिलेटेड स्वरुपात असल्या कारणाने, जमिनीत खतांतुन टाकल्यानंतर म्हणा किंवा आधीपासुनच पिकास उपलब्ध अशा स्वरुपात असलेल्या फॉस्फोरस सोबत स्थिर होत नाही.

आपण ग्लुकोनेट खते सध्या वापरतो, ती देखिल सेंद्रिय आम्लांसोबतच चिलेट केली असल्याने ग्लुकोनेट म्हणतात. शिवाय ई डि टि ए हा देखिल सेंद्रिय आम्लाचाच एक प्रकार आहे. ग्लुकोनेट, ई डि टि ए आणि सायट्रिक असिड हे शब्द आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकलेले आहेत, म्हणुन त्यांचा येथे उदाहरण समजण्यास सोपे जावे म्हणुन उल्लेख केलेला आहे.

सेंद्रिय आम्ले जी सुक्ष्मजीवांच्या व्दारा स्रवली जातात, ती चिलेशन, विरघळवणे आणि सामु कमी करणे ह्या क्रियांच्या व्दारा मातीत असलेल्या खतांचे, आणि त्यांच्या स्थिर स्वरुपाचे रुपांतर पिकास उपलब्ध होईल अशा स्वरुपात करतात.

ह्यांची कार्य करण्याची पध्दत ही सावकाश आणि कमी तिव्रतेची असल्या कारणाने, आणि जमिनीत वारंवार वरुन खतांचा वापर सतत होत असल्या कारणाने हि अशी जैविक उत्पादने देखिल कदाचित वारंवार वापरत राहवीच लागणार आहेत. फरक ईतका नक्की पडु शकतो की, पुर्वी जे दर ३० दिवसांनी वापराने लागणार होते ते कदाचीत ६० दिवसांनी वापरावे लागेल.

रासयनिक आम्ले सेंद्रिय आम्ले
सल्फ्युरिक असिड, फॉस्फोरिक असिड, नायट्रिक असिड, हायड्रोक्लोरिक असिड आदी ग्लुकोनिक असिड, मॅलिक असिड, ग्लाऑक्झालिक असिड, सक्सिनिक असिड, टारटॅरिक असिड, फ्युमॅरिक असिड, अल्फा केटो ब्युट्रिक असिड, ऑक्झॅलिक असिड, सायट्रिक असिड, २-केटो ग्लुकोनिक अँसिड आदी
हायड्रोजन आयन चे पुर्णतः (100%) विघटन होवुन, कमी वेळेत जास्त प्रमाणात सामु कमी करण्याची क्षमता हायड्रोजन आयन चे पुर्णतः विघटन (5 – 10%) होत नसल्या कारणाने सामु लागलिच खुप कमी होत नाही.
कृत्रिम पध्दतीने तयार केले जातात. सुक्ष्मजीवांच्या व्दारा स्रवले जातात.
कमी प्रमाणात वापरावे लागते. जास्त प्रमाणात गरजेचे असतात. जितके जास्त उपयुक्त सुक्ष्मजीव तितक्या जास्त प्रमाणात तयार होतात.
मातीत असलेल्या आणि स्थिर झालेल्या घटकांचे रुपांतर उपलब्ध स्वरुपात करतात. मातीत असलेल्या आणि स्थिर झालेल्या घटकांचे रुपांतर उपलब्ध स्वरुपात करतात.
मातीतील घटक उपलब्ध स्वरुपात करण्याचा वेग आणि पिकाने ग्रहण करण्याचा वेग यांचे संतुलन न साधले गेल्यास पुन्हा स्थिर स्वरुप तयार होते. कार्य करण्याचा वेग हा मंद असल्या कारणाने पिकाच्या व्दारा ग्रहण करण्याच्या वेगाने नुकसान होत नाही. चिलेशन करण्याची क्षमता असल्या कारणाने मुक्त झालेले घटक पुन्हा नव्याने स्थिर स्वरुपात रुपांतरित होत नाहीत.
मातीतीत हानीकारक क्षारांपासुन देखिल नविन हानीकारक पदार्थ तयार करतात. मातीतील हानीकारक क्षारांचे चिलेशन करुन त्यांना खोलवर वाहुन नेण्याची क्षमता ठेवतात. माती विषरहित करण्याची क्षमता आहे.
मातीत असलेल्या ईतर उपयुक्त जीवांसाठी हानीकारक ठरतात. मातीत असलेल्या ईतर जीवांसाठी हानीकारक ठरत नाहीत.
पिकासाठी पोषक द्रव्ये मिळवुन देत नाहीत. पिकासाठी ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, जीब्रॅलिन्स मिळवुन देतात.
सध्या ज्या पध्दतीने वापर होतो आहे, त्यास पुर्णतः शास्रिय पध्दतीने करावयाचे म्हंटल्यास वापर हा सतत करावा लागेल, कारण पिक रोज अन्नद्रव्ये ग्रहण करत असते, म्हणजे दररोज वापरावे लागते. वारंवार वापर करण्याची गरज पडत नाही. एकदा वापरले की, मातीत सुक्ष्मजीवांची संख्या वाढत राहते.
हाताळण्यास धोकदायक ठरतात. हाताळण्यास धोकेदायक ठरत नाहीत.
समस्या तात्पुरती मात्र अत्यंत वेगात सोडवतात. समस्या दिर्घकाळासाठी मात्र रसायनांच्या तुलनेने सावकाश सोडवतात.सुक्ष्मजीवांची संख्या जास्त असेल तर वेग वाढविता येतो.
मुळांपासुन दुर रासायनिक अभिक्रिया घडतात. मुळांपर्यंतच्या प्रवासात मुक्त झालेले घटक पुन्हा स्थिर होण्या तसेच मातीत वाहुन जाण्याचा धोका नाकारता येत नाही. विशेष करुन स्फुरदचा प्रवासाचा वेग हा अत्यंत कमी असल्या कारणाने पिकास लवकर मिळत देखिल नाही. सुक्ष्मजीव मुख्यत्वे मुळांच्या जवळ वाढुन तेथे सेंद्रिय आम्ल स्रवतात, ज्यामुळे मुळांच्या जवळच उपलब्ध असतात. सुक्ष्मजीव गटाने वाढतात त्यामुळे मोठा परिसर व्यापुन असतात. मुळांच्या वाढीसाठी फायदेशीर द्रव्ये देखिल स्रवत असल्या कारणाने जास्तीत जास्त परिसरात मुळे पोहचुन अन्नद्रव्ये मिळतात.
मातीतीत विषारी द्रव्ये, हानीकारक रसायने ह्यापासुन एखादा नविन पदार्थ तयार करतात. मातीतील विषारी द्रव्ये, हानीकारक रसायने ह्यांचा चिलेशन, वाहुन टाकणे ह्याव्दारे नायनाट करतात. यांस डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. (Detoxification )