logo

ट्रायकोडर्मा स्पे. –

ट्रायकोडर्मा हा शब्द आणि बुरशी भारतातील प्रगतिशील पासुन तर पुरोगामी अशा सर्वच शेतक-यांना ज्ञात असलेली एकमेव बुरशी आहे. उपयुक्त बुरशी असे जर कोणी म्हंटले तर आपल्या समोर सर्वात आधी ट्रायकोडर्मा ही बुरशी येते.

ट्रायकोडर्माच्या ८९ प्रजाती आहेत, त्यापैकी ट्रायकोडर्मा व्हीरीडे आणि ट्रायकोडर्मा हरजॅनियम ह्या दोन प्रजाती आपणास प्रामुख्याने ज्ञात आहेत. ह्या दोन प्रजातींचा वापर हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात.

ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळुन येते, मुळांच्या परिसरात जास्त प्रमाणात ट्रायकोडर्माची वाढ दिसुन येते. मुळांच्या व्दारा स्रवल्या जाणा-या विविध अन्नरसांपासुन ट्रायोकडर्माला अन्न मिळत असल्याने त्यांची वाढ हि मुळांच्या परिसरात फार जास्त प्रमाणात होते.

ट्रायकोडर्मा मुळांच्या वर भरपुर प्रमाणात वाढतात, ज्या प्रमाणे मायकोरयझा चे मुळांच्या वर थर बनतात, तसेच काहीसे ट्रायकोडर्मा करत असते. अशा प्रकारच्या वेष्टणामुळे पिकाचे जमिनीतील हानीकारक रोगांपासुन रक्षण होते. मुळांच्या वर वाढत असतांना काही प्रमाणात ट्रायकोडर्मा ही बुरशी मुळांच्या आत देखिल वाढते, ज्यामुळे पिकास रोगाचा हल्लाच झालेला आहे अशा प्रकारचे संदेश जावुन पिक तात्काळ त्याची संरक्षण प्रणाली सतर्क करते, यास आपण ज्या प्रमाणे लहान बाळांना लस देतो त्याच प्रमाणे पिकाची कार्य प्रणाली असते असे म्हणु शकतो. थोड्या शास्रिय शब्दात यांस सिस्टिमिक एक्वायर्ड रसिस्टंस (SAR) असे म्हणतात. यात पिकाच्या एका बाजुला हल्ला झाला आहे, असे ज्यावेळेस पिकाच्या संरक्षण संस्थेला कळते, त्यावेळेस जेथे हल्ला झाला तेथे आणि पिकाच्या ईतर भागातील देखिल संरक्षण प्रणाली सतर्क राहते.

ट्रायकोडर्माच्या वाढीसाठी १५ ते ३० डि.से. तापमान योग्य ठरते. जमिनीतुन वापरत असतांना जमिनीत मोकळी हवा खेळती राहील आणि वाफसा परिस्थिती राहील याची काळजी घ्यावी. ट्रायकोडर्माच्या वाढीसाठी हवेतील आर्द्रता ही ७५ ते ८५ टक्के इतकी असावी. ट्रायकोडर्मा बुरशी अलैंगिक पध्दतीने प्रजनन करते, त्यात हि बुरशी कोनिडिया तयार करते.

ट्रायकोडर्माची वापर हा विविध पिकांच्या मुळांवर हल्ला करणा-या डँपिग ऑफ, फ्युजॅरिम विल्ट, पिथियम विल्ट, फायटोप्थोरा, स्लेरोशियम ह्या रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.

ट्रायकोडर्माचा वापर हा बीज प्रक्रिया, जमिनीतुन देणे तसेच फवारणीतुन देखिल करतात. पिका वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या मुळांची वाढ जशा प्रमाणात वाढेल त्यानुसार मुळांच्या जास्तीत जास्त संर्पकात ट्रायकोडर्मा येणे गरजेचे आहे.