logo

Nematodes (सुत्रकृमी किंवा निमॅटोड)

सुत्रकृमी किंवा निमॅटोड हा शेती मधील सध्याचा सर्वाधिक चिंतेचा विषय झालेला आहे. ह्यांना राऊंड वर्म, ईलवर्म अशा नावांनी देखिल ओळखले जाते. भाजीपाला पिके, फळ बागा, फुलशेती ह्यापैकी प्रत्येक क्षेत्रास निमॅटोड ने बाधीत केलेले आहे. विशेष करुन डाळिबं पिकातील निमॅटोडमुळे होणारे नुकसान हे सध्यातरी सर्वाधिक चर्चेत राहीले आहे.

निमॅटोड च्या शरिराची रचना हि एखाद्या नळी मध्ये नळी अशा प्रकारची असते. तोंडाकडुन सुरु होणारी नळी हि विष्ठा विसजर्नाच्या मार्गापर्यंत सरळ अशी असते. निमॅटोड ला तोंड असते, ज्यात ३ ते ६ ओठ असतात, तसेच दात देखिल असतात. मादीच्या शरिरात एक पिशवी सारखा अवयव असतो, ज्यात मादी, मिलनातुन नरापासुन प्राप्त झालेले शुक्राणु जमा करुन ठेवते, ज्यावेळेस अंडी तयार करावयाच्या असतात, त्यावेळेस मादी शुक्राणु वापरत असते. पुर्नत्पादन हे नर मादी मिलनाच्या शिवाय देखिल होत असते.

सुत्रकृमींच्या जगभरात किमान १० लाख प्रजाती आहेत, त्या पैकी आपण आता पर्यंत केवळ २०,००० ते २५,००० प्रजाती पुर्णपणे जाणुन आहोत. ह्या निमॅटोड च्या प्रजातीं पैकि, निम्म्याहुन अधिक हे परजीवी आहेत. मातीच्या १ चौरस मीटर क्षेत्रात २ ते १० लाख निमॅटोड असु शकतात. जगाच्या पाठीवरिल एकुण बहुपेशीय जीवांच्या दर ५ जीवांपैकि ४ जीव हे सुत्रकृमी आहेत आणि म्हणुनच पृथ्वीवरिल एकुण प्राण्यांच्या संख्येपैकी ८० टक्के संख्या हि सुत्रकृमींची असावी असा अंदाज आहे. समुद्रात, गोड्या पाण्यात, पर्वत शिखरांवर, उष्ण कटिबंधात, शीत कटिबंधात, प्राण्यांच्या शरिरात, वनस्पतींच्या मुळांत, जमिनीत अशा जवळपास सर्वच ठिकाणी निमॅटोड आढळुन येतात.

निमॅटोड च्या काही प्रजातींच्या मादीच्या शरिररात एकाच वेळेस २७ लाख अंडी असु शकतात, ज्यापैकी दिवसाला २ लाख अंडी शरीराच्या बाहेर टाकली जावुन नविन पिढी जन्माला येत असते. सुत्रकृमी हे जगभरातील पिक उत्पादनातील १५ टक्के हिस्सा खावुन जातात असे म्हणता येईल. जगभरातील पिकांवर निमॅटोडच्या हल्ल्या मुळे होणारे नुकसान हे ७८ कोटी अमेरिकन डॉलर ईतके असण्याचा अंदाज आहे. जपान मधिल पाईन वृक्षांची सर्रास कत्तल ह्या निमॅटोड ने केलेली आहे. पिकाच्या मुळांत राहुन अन्नरस ग्रहण करणारे हे निमॅटोड प्रचंड संख्येने वाढतात, अंडी देण्याचा अती जास्त वेग असल्याने प्रत्येक दिवशी लाखो भुकेली तोंडे पिकावर अक्षरशः तुटुन पडतात. जपान मधिल लाखो पाईन वृक्षांच्या मृत्युस कारणीभुत ठरणारे निमॅटोड वनस्पतींच्या व्यतिरिक्त मानव, प्राणी, जीवाणू आणि बुरशी ह्यांच्या शरिरात राहुन देखिल उपजीविका करतात.

बोरेलुस ह्या शास्रज्ञांस १६५६ साली व्हेनेगर मध्ये काही सुक्ष्म सापासारखे जीव दिसलेत, त्यांना त्याने व्हेनेगर ईल असे नाव दिले होते. आज देखिल ब्रिटन मध्ये निमॅटोड किंवा सुत्रकृमींना ईल-वर्म (eel-worm) ह्या संज्ञेने ओळखले जाते. निधाम ह्या शास्रज्ञाने गव्हाच्या दाण्यांनी कुटुन त्यात असणा-या सुत्रकृमींना सापासारखे, ईल आहेत असे म्हंटले होते. १८७० ते १९१० च्या काळात जेव्हा युरोपात बीट पासुन साखर तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढलेला होता, तेव्हा कुन्ह ह्या शास्रज्ञाने सर्वप्रथम जमिनीत कार्बन डायसल्फाईड चा वापर धुरीकरण करण्यासाठी केला होता. त्याकाळात जर्मनी मधिल बीट च्या शेतात, लागवडी पुर्वी कार्बन डायसल्फाईड चा वापर करुन धुरीकरण करुन निमॅटोड चे नियंत्रण केले जात होते.

अमेरिकेने साल्ट लेक शहरातील त्यांच्या पोस्ट ऑफिस मध्ये १९१८ साली निमॅटोड चा शास्रिय दृष्टीकोनातुन परिपुर्ण अभ्यास करण्यासाठी हॅरी शॉ ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक नविन विभाग सुरु केला होता. हा विभाग कदाचित निमॅटोड च्या बाबतीत शास्रिय पध्दतीने अभ्यास करण्यासाठी सुरु करण्यात आलेला पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर निमॅटोड ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी जगभरातुन अनेक शास्रज्ञ आणि सरकारे पुढे आलीत. निमॅटोलॉजी हा एक नविन अभ्यासक्रमच सध्या सुरु आहे. निमॅटोड बाबत अधिक जाणुन घेण्या साठी निमॅटोलॉजी हे शास्र पुर्णवेळ कार्य करते.

नेदरलँड मधिल शास्रज्ञ डॉ. जॉन्हन्स गोव्हर्टस (१८५० ते १९३०) ह्यांना निमॅटोलॉजी शास्राच्या जनकांपैकी एक महत्वाचे शास्रज्ञ म्हणुन गणले जाते. त्यांनी निमॅटोड वर जवळपास १६० शोध निबंध लिहिलेत. नेदरलँड जेव्हा जगभराची बटाटा गरज पुर्ण करण्याची क्षमता बाळगुन होते तेव्हा बटाटा पिकावरिल सिस्ट ह्या निमॅटोडच्या प्रजातीच्या बाबतीत झालेले संशोधन अत्यंत महत्वपुर्ण मानले जाते. डॉ. जॉन्हन्स ह्यांची निरिक्षणे आज देखिल प्रमाण म्हणुन मानली जातात, त्या काळातील कमी शक्तीच्या सुक्ष्मदर्शकाचा वापर करुन त्यांनी केलेले संशोधन हे आज देखिल तंतोतंत लागु पडते.

शेती पिकावरिल निमॅटोड चे प्रकार

विविध पिकांवर येणा-या निमॅटोड च्या प्रकारांबाबत काही माहीती हि पॅसिलोमायसिस ह्या सदरात देण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी आपण निमॅटोड च्या प्रत्येक जाती बाबत विस्तृत स्वरुपात जाणुन घेणार आहोत.

पिकावर येणा-या निमॅटोड चे

१. रुट नॉट निमॅटोड म्हणजेच मुळांवर गाठी तयार करणारे सुत्रकृमी

२. सिस्ट निमॅटोड, मुळांवर गाठी तयार करत नाही.

३. रुट बरोईंग निमॅटोड म्हणजेच मुळांत बीळ तयार करुन त्यात राहणारे निमॅटोड

४. रेनीफॉर्म निमॅटोड – किडनीच्या आकाराची मादी असलेली निमॅटोड ची प्रजाती

असे प्रमुख प्रकार पडतात.

१. रुट नॉट निमॅटोड

रुट नॉट निमॅटोड च्या नावातच त्याचा गुणधर्म लपलेला आहे. भारतात सर्वाधिक प्रमाणात ह्या गटातील सुत्रकृमी किंवा निमॅटोड दिसुन येतात. पिकाच्या मुळांवर असंख्य गाठी तयार करणारी हि प्रजाती भुईमुग, भेंडी, काजु, अननस, पालक, बीट रुट, बीन्स, हेम्प, कोबी, फुलकोबी, कॉफी, नारळ, कोथंबीर, काकडी व इतर वेल वर्गिय पिके, हळद, गाजर, सुरण (याम), कापुस, सुर्यफुल, कडधान्य, आंबा, केळी, काळे मीरे, ऊस, टोमॅटो, द्राक्ष, डाळींब अशा अनेक पिकांवर दिसुन येते.

रुट नॉट निमॅटोड किंवा मुळांवर गाठी करुन त्यात राहणारे निमॅटोड हे मेलिडोगायनी ह्या गटात मोडतात. मेलिडोगायनी हा शब्द ग्रीक कुळातला असुन त्याचा अर्थ हा सफरचंदाच्या आकाराची मादी असा होतो.

सर्व प्रथम १८५५ साली काकडी पिकावर रुट नॉट निमॅटोड चा प्रादुर्भाव होतो ह्याची नोंद बर्केली ह्या शास्रज्ञाने केली होती. नील ह्या शास्रज्ञाने १८८९ साली कसाव्हा ह्या पिकार मेलिडोगायनी चा प्रादुर्भाव असतो ह्याची नोंद घेतली.

मुळांवर गाठी केल्याने, पिकास होणारा अन्नद्रव्य आणि पाण्याचा पुरवठा बाधीत होत असल्या कारणाने, प्रादुर्भावग्रस्त रोपांची वाढ खुंटते, पिकावर अन्नद्रव्य आणि पाणी कमतरतेची लक्षणे दिसुन येतात, आणि परिणामी उत्पादनात देखिल मोठी घट येते.

मेलिडोगायनी गटात ९० प्रजाती आहेत, ज्यापैकी M. javanica, M. arenaria, M. incognita, and M. hapla ह्या प्रजाती पिकासाठी जास्त प्रमाणात घातक ठरत असल्याची नोंद आहे.

मेलिडोगायनी ह्या रुटनॉट निमॅटोड प्रजातीची मादी पिकाच्या मुळांवर गाठी करुन राहते. मादीच्या तोंडाशी असलेल्या सुईच्या टोकासारख्या भागामुळे हि मादी पिकाच्या पेशी भेदुन मुळांच्या आत शिरते. मादीच्या व्दारा स्रवल्या गेलेल्या पदार्थांमुळे, सभोवतालच्या परिसरातील मुळांच्या पेशीतील केंद्रकांची संख्या झपाट्याने वाढते. हा एक प्रकारचा असा जेनेटिक (जुनकिय) बदल असतो. नैसर्गिक रितीने पिकाच्या मुळांच्या पेशीचे विभाजन होत असतांना एका पेशीपासुन दोन पेशी तयार होत असतात, मात्र निमॅटोड च्या हल्ल्यामुळे एका पेशीच्या दोन पेशी तयार न होता, प्रत्येक पेशीतील केंद्रकांची संख्या तेवढी मोठ्या प्रमाणात वाढते, अशा प्रकारे पेशीतील केंद्रकांची संख्या वाढल्याने पेशीचा आकार मोठा होतो. काही ठराविक पेशींचाच आकार मोठा होत गेल्याने, त्यांच्या सभोवतालाचा परिसर हा फुगुन गाठीसारखा दिसुन येतो.

आकाराने मोठ्या पेशी व्दारे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती होते. आकारने मोठ्या झालेल्या पेशीतुन निमॅटोड स्टायलेट नावाच्या सुई सारख्या टोकदार अवयवाच्या व्दारे पेशीतील रस शोषण करत असते, हा अवयव निमॅटोड साठी फिल्टर सारखा कार्य करुन, गरजेची तेवढी अन्नद्रव्ये ग्रहण करत असतो. निमॅटोड च्या उपस्थितीमुळे आकाराने मोठ्या झालेल्या पेशीत, पिकाव्दारा देखिल मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य पाठवली जावुन, निमॅटोड साठी ते फायदेशीर ठरते. निमॅटोड च्या मृत्युनंतर आकाराने मोठ्या झालेल्या पेशी देखिल नष्ट होतात.

सोयबीन, हरभरा, भुईमुग, उडीद, मुग ह्या पिकांच्या मुळांवर रायझोबियम च्या गाठी तयार होतात. रायझोबियम हा उपकारक आणि सहजीवी जीवाणू पिकासाठी हवेतील नत्र स्थिर करणा-या गाठी तयार करुन पिकाच्या मुळांत राहत असतो. रायझोबियम ने अशा प्रकारे तयार केलेल्या गाठी ह्या सहज रित्या मुळांपासुन वेगळ्या करता येतात, मात्र रुट नॉट निमॅटोड ने तयार केलेल्या गाठी ह्या सहज रित्या मुळांपासुन वेगळ्या करता येत नाहीत.

Nematodes
Nematodes
Nematodes
Nematodes
Nematodes
Nematodes
Nematodes
Nematodes
Nematodes
Nematodes

मेलिडोगायनी ची मादी एका दिवसाला २०० ते १००० पेक्षा जास्त अंडी देते. वातावरण हानीकारक असल्यास मादी आणि नर निमॅटोड च्या मिलनातुन अंडी तयार होतात, मात्र वातावरण पोषक असल्यास अशा प्रकारच्या कोणत्याही मिलनाची गरज न पडता देखिल मादी अंडी देत राहते. मादीच्या शरीरीच्या मागिल टोकाकडील भागात अंडी तयार होतात, योग्य वेळी हि अंडी एका पातळ पापुद्रा सारख्या वेष्टणातुन मुळांच्या परिसरात सोडली जातात. पोषक वातावरणात निमॅटोडची अंडी वर्षभर देखिल जमिनित राहु शकतात.

अंड्यांच्या आतच कात टाकुन जुवेनाईल १ हि अवस्था पुर्ण करतात. अंड्यांतुन बाहेर येतांना जुवेनाईल २ हि अवस्था येते. अंड्यांतुन पिल्ले बाहेर येण्यासाठी जमिनीत पाण्याची उपस्थिती आणि उबदार वातावरण गरजेचे असते. निमॅटोड हे वास्तविक पाण्यात राहणारेच जीव असल्या कारणाने त्यांच्या वाढीसाठी जमिनीत पाणी असणे हे अत्यंत गरजेचे असते. जमिनीत असलेल्या पाण्यातुन, जुवेनाईल २ हि अवस्था एक ठिकाणाहुन दुस-या ठिकाणी प्रवास करते. जुवेनाईल २ हि अवस्था मुळांच्या पेशीला भेदुन आत शिरते. आत शिरल्यानंतर, त्यांच्या स्टायलेट ह्या विषेश अवयवतुन जो विशिष्ट (इसोफॅगल ग्लॅड मधुन स्रवणारे प्रोटिन्स) द्रव स्रवला जातो त्याच्याने मुळांच्या पेशीत जनुकिय बदल घडुन, पेशींचा आकार वाढतो. मुळांवर अशा प्रकारे गाठी तयार केल्यानंतर जुवेनाईल २ हि अवस्था आत स्थिरावुन, ३ आणि ४ ह्या पुढिल दोन अवस्था पार करुन प्रौढ अवस्थेत पोहचतात. प्रौढ अवस्था हि गाठीत राहुन पुन्हा अंडी देण्यास सुरवात करते. निमॅटोड ची एक पिढी उन्हाळ्यात ४ ते ६ आठवड्यात पुर्णत्वास जाते, तर हिवाळ्यात एक पिढी १० ते १५ आठवड्यात पुर्वत्वास जाते.

रुट नॉट निमॅटोड ची मेलिडोगायनी ईन्कॉगनिटा आणि मेलिडोगायनी जवानिका ह्या प्रजाती भारतात जास्त प्रमाणात आढळुन येतात. मेलिडोगायनी ईन्कॉगनिटा हि जात अनेक पिकांच्या मुळांवर गाठी तयार करण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे पिक फेर पालट करुन देखिल नियंत्रण मिळवणे कठिण जाते. डाळिंब, आणि भाजीपाला पिकात ह्या दोन्ही प्रजाती हल्ला करण्याची क्षमता ठेवतात.

मेलिडोगायनी अरेनारिया हि प्रजाती भारतात भुईमुग पिकावर दिसुन येते. भुईमुगावरिल मुळांच्या गाठींसाठी कारणीभुत असलेली हि प्रजाती काही भाजीपाला पिकांवर देखिल हल्ला करण्याची क्षमता ठेवते.

भारतातील पर्वतीय भागात मेलिडोगायनी हॅपला हि प्रजाती दिसुन येते. गुजरात राज्यातील संत्री पिकास मेलिडोगायनी इंडिका ह्या प्रजातीमुळे नुकसान होते.

२. सिस्ट निमॅटोड

सिस्ट निमॅटोड हे प्रामुख्याने सोयाबीन, बटाटा, टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची ह्या पिकावर आढळुन येतात. सिस्ट निमॅटोड हे मुळांच्या आत राहुन पिकाव्दारा निर्मित अन्नरस शोषुन घेत असले तरी, ते रुट नॉट निमॅटोड प्रमाणे मोठ्या गाठी तयार करत नाहीत. ह्या प्रजातीच्या मादीच्या शरिरात अंडी साठवुन ठेवलेली असतात.

२.१ सोयबीन सिस्ट निमॅटोड

सोयाबीन सिस्ट निमटोड (Heterodera glycines) हे केवळ सोयाबीन पिकाच्या मुळांवर हल्ला करतात. सोयाबीन सिस्ट निमॅटोड हे अफ्रिका, अमेरिका, चीन, जपान, रशिया, इंडोनेशिया,तैवान, कोरिया, कॅनडा, अर्जेंटिना, ब्राझिल, चिली, कोलंबिया आणि ईक्वाडोर ह्या देशात आढळुन येतात.

ईतर निमॅटोड प्रमाणेच ह्या निमॅटोड ची देखिल जुवेनाईल २ हि अवस्था मुळांवर हल्ला करण्याची क्षमता ठेवते. मातीत असलेल्या पाण्यात प्रवास करुन मुळांच्या संपर्कात आलेली जुवेनाईल २ हि अवस्था, पिकाच्या मुळांच्या आत शिरते. मुळांच्या आत शिरल्यानंतर पिकाव्दारा निर्मित अन्नरस शोषुन घेतात. सिस्ट निमॅटोड व्दारा रस शोषुन घेतल्या गेल्याने त्यांचा आकार वाढतो. मादी चा आकार हा ईतका वाढतो की, ती मुळांच्या बाहेर वाढलेली दिसुन येते. नर हा मादीच्या ईतका फुगत नाही, त्यामुळे तो, मुळांच्या बाहेर येवुन नव्याने मादीच्या शोधात जाण्यास सक्षम असतो. सोयीबीन सिस्ट निमॅटोड ची १ पिढी हि २४ ते ३० दिवसांत पुर्ण होते.

मादीच्या शरीराच्या आत २०० ते ४०० अंडी तयार होतात. मादी हि अंडी तिच्या शरिरातुन बाहेर टाकत नाही, तर तिच्या मृत्यु पर्यंत शरिरातच ठेवते. मादीच्या मृत्यु नंतर, तिच्या शरिराच्या कडक होण्याने अंड्यांना एक प्रकारचे संरक्षण मिळुन ते योग्य परिस्थिती जो पर्यंत मिळत नाही तोवर तसेच संरक्षक कवचाच्या आत राहतात. ह्या अशा संरक्षक कवचाला सिस्ट असे म्हणतात. सिस्ट अनेक महिने देखिल जमिनीत राहु शकतात. शेतात वापरले जाणारे वाहन, तसेच अवजारे, मानव, प्राणी, माती ह्यांच्या व्दारा प्रादुर्भावग्रस्त मातीतुन निरोगी मातीत ह्या निमॅटोड चा सिस्ट व्दारे प्रसार होत असतो.

२.२ बटाटा पिकावरिल सिस्ट निमॅटोड

बटाटा पिकावरिल सिस्ट निमॅटोड (Globodera ) हे बटाटा पिकाच्या व्यतिरिक्त टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची अशा सोलेनेसियस गटातील पिकांच्या मुळांवर हल्ला करतात.

बटाटा पिकाच्या मुळांव्दारा स्वरल्या जाणा-या सोलॅनोक्लोपाईन – ए ह्या द्रव्यामुळे सिस्ट मधिल अंडी फुटुन त्यातुन जुवेनाईल अशी मुळांवर हल्ला करण्यास सक्षम अवस्था बाहेर येते. ह्या निमॅटोड ची १ पिढी हि थंड वातावरणात १ वर्षात पुर्ण होते. सोयीबीन सिस्ट निमॅटोड प्रमाणेच सर्व अवस्था पुर्ण होतात, आणि मादी देखिल सिस्ट तयार करुन त्यात अंडी लपवुन ठेवत असते.

३. रुट बरोईंग निमॅटोड

बरोईंग म्हणजेच उंदरा प्रमाणे बीळ तयार करु शकणारे हे निमॅटोड केळी, संत्री, आले, चहा, नारळ, मीरे, टोमॅटो, पानपिंप्री, लवंग आदी पिकांवर आढळुन येतात. हे निमॅटोड मुळांवर गाठी तयार न करता मुळांच्या आत पोकळी निर्माण करत जातात. केळी पिकावरिल बरोईंग निमॅटोड (Radopholus similis) आणि संत्री पिकावरिल बरोईंग निमॅटोड (Radopholus citrophilus) पिकातील होणारे नुकसान हे सर्वाधिक आहे. बरोईंग निमॅटोड हे सबंध जगभर आढळुन येतात.

Root Burrowing Nematodes
Root Burrowing Nematodes
Root Burrowing Nematodes

बरोईंग निमॅटोड ने प्रादुर्भाव ग्रस्त पिकाच्या मुळांचा रंग बाहेरुन काळसर, तपकिरी दिसुन येतो. पिकाची वाढ खुंटते, आणि पिकावर पाणी तसेच अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसुन येतात.

बरोईंग निमॅटोड च्या देखिल अंडी, १,२,३,४ अशा चार जुवेनाईल अवस्था आणि प्रौढ अवस्था अशा चार अवस्था असतात. ह्या निमॅटोड च्या जुवेनाईल आणि मादी अवस्थांना केवळ पिकाच्या आत शिरण्याची क्षमता प्राप्त असते. नर निमॅटोड च्या स्टायलेट मध्ये ती शक्ती नसल्या कारणाने ते मुळांच्या आत शीरु शकत नाहीत. बरोईंग निमॅटोड च्या सर्व अवस्था ह्या मुळांच्या आतच पुर्ण होत असतात. मादी हि नरासोबत च्या मिलनातुन तसेच मिलनाच्या शिवाय देखिल अंडी देते. अंडी अवस्था ते प्रौढ अवस्था हि मुळांच्या आत पुर्ण होते. मादी व्दारा अंडी दिल्यानंतर त्यातुन बाहेर येणारी जुवेनाईल २ हि अवस्था कात टाकुन २ ते ४ ह्या जुवेनाईल अवस्था पुर्ण करतात. मादी दिवसाला २ ते ६ अंडी देते. जुवेनाईल अवस्था हि मुळांतच राहुन पुढे सरकत जाते, किंवा मुळांच्या बाहेर येवुन नविन मुळांत शिरुन तेथे जिवनकाल पुर्ण करते. ह्या निमॅटोड च्या वाढीसाठी २१ ते २५ डि.से. तापमान योग्य ठरते.

४. रेनिफॉर्म निमॅटोड

रेनिफॉर्म निमॅटोड (Rotylenchulus reniformis) हे फळपिके, कापुस, चवळी, चहा, तंबाखु, अननस, केळी, भेंडी, नारळ, कोबी, मका, अल्फा अल्फा, काकडी, टोमॅटो, मुळा, वांगी, पेरु, कलिंगड, खरबुज, आले आदी पिकांवर आढळुन येतात. हवाई मध्ये चवळी पिकावर सर्वप्रथम हि प्रजाती आढळुन आली. रेनिफॉर्म हे नाव, ह्या निमॅटोड च्या मादीच्या किडनीच्या आकारामुळे ह्यांस प्राप्त झालेले आहे. ह्या निमॅटोड ची मादी हि पिकाच्या मुळांच्या आत शिरुन तेथुन रस शोषण करत असते. मादीच्या शरिराचा पुढिल भाग केवळ मुळांच्या आत शिरलेला आढळुन येतो.

भारतातील कापुस उत्पादक परिसरात ह्या प्रकारच्या निमॅटोडचा प्रादुर्भाव दिसुन येतो. कापुस पिकाची पाने पिवळी दिसुन येतात, तसेच पानांचा आकार देखिल लहान राहतो.

नियंत्रणाचे उपाय

निमॅटोड किंवा सुत्रकृमी हे अत्यंत वेगाने वाढणारे आणि अनेक पिकांवर हल्ला करण्याची क्षमता असल्या कारणाने नियंत्रणात आणण्यास कठिण असतात. सुत्रकृमींच्या निंयत्रणासाठी जैविक नियंत्रण, रासायनिक नियंत्रण तसेच पिक फेरपालट ह्यांचा एकात्मिक वापर करणे फायदेशीर ठरते. कोणत्याही एका पध्दतीवर अवलंबुन राहुन सुत्रकृमी किंवा निमॅटोड चे पुर्ण नियंत्रण मिळणे कठिण आहे. वाढीचा वेग हा अत्यंत जास्त असल्या कारणाने, आणि चपळ जुवेनाईल अवस्थांमुळे निमॅटोड चे १०० टक्के नियंत्रण मिळवणे तसे अत्यंत कठिण आणि खर्चिक काम आहे.

पिक फेरपालट

भाजीपाला, आणि धान्य पिकांतील निमॅटोड ची समस्या हि, निमॅटोड प्रती प्रतिकारक असणा-या पिकांचा पिक फेरपालट मध्ये वापर करुन काही प्रमाणात मिटवता येणे शक्य असते. मेलिडोगायनी जवानिका ह्या प्रजातीस प्रतिकारक असणा-या गाजर, मिरची, फुलकोबी, लसुण, कांदा, मुळा, गवार, मोहरी, टोमॅटो-कांदा, आणि प्रतिकारक टोमॅटो – भेंडी ह्यांचा वापर केल्यास मेलिडोगायनी जॅपोनिका ह्या प्रजातीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळते. आपल्या कडे निमॅटोड ची नेमकी कोणती जात पिकावर हल्ला करत आहे हे कळाल्या शिवाय अशा प्रकारचा प्रयोग करणे हे जरा धाडसाचेच कार्य ठरेल. मेलिडोगायनी जवानिका, आणि मेलिडोगायनी ईन्कॉगिनिटा ह्या दोन्ही जाती महाराष्ट्रात आढळुन येतात. महाराष्ट्रात द्राक्ष, डाळींब, पानवेली, बटाटा, तंबाखु, चवळी आणि भेंडी ह्या पिकावर मेलिडोगायनी ईन्कॉगिनिटा जातीचा प्रादुर्भाव दिसुन येतो. तसेच मेलिडोगायनी जवानिका ह्या प्रजातीचा प्रादुर्भाव हा चवळी पिकांवर दिसुन येतो. मेलिडोगायनी अरेनारिया ह्या प्रजातीमुळे भुईमुग पिकाच्या मुळांवर गाठी तयार होतात. राहुरी कृषी विद्यापिठ, राहुरी आणि संगमनेर येथिल डाळिंब लागवडीत मेलिडोगायनी ईन्कॉगिनीटा आणि मेलिडोगायनी जवानिका ह्या दोघांचा प्रादुर्भाव दिसुन आलेला आहे.

शेतात झेंडुच्या (Tagetes sp.) रोपांची लागवड केल्यास त्यामुळे देखिल निमॅटोड वर नियंत्रण मिळण्यास मदत होते. झेंडुच्या मुळांतुन स्रवणा-या अल्फा टर्थिनिल ह्या द्रव्यामुळे निमॅटोड च्या नियंत्रणात मदत मिळते असे आढळुन आले आहे. ((Gommers et al, 1980). ह्या शिवाय गवार, मोहरी, आणि कांदा ह्या पिकांचा देखिल सुत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडुच्या रोपांसारखा फायदा होतो असे आढळुन आले आहे.

जैविक उपाययोजना

सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिस लिलासिनस ही बुरशी परिणामकारक आढळुन आली आहे. पॅसिलोमायसिस जैविक नियंत्रणात बुरशींच्या सोबत निंबोळी पेंड, करंज पेंड यांचा एकत्रीत केलेला वापर फायदेशीर ठरतो.

ट्रायकोडर्मा हरजॅनियम च्या वापरामुळे देखिल मेलिडोगायनी जवानिका ह्या निमॅटोडच्या प्रजातीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. ट्रायकोडर्मा च्या चिटिनेझ ह्या एन्झाईम मुळे निमॅटोड च्या वाढीवर नियंत्रण मिळते, तसेच पिकाची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यामुळे देखिल नियंत्रण मिळण्यात मदत मिळते. (Sahebani and Hadavi, 2008).

पिकाच्या वाढीसाठी पोषक ठरतील अशा विविध प्रकारच्या सुक्ष्मजीवांच्या वापरातुन पिकास योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळाल्याने तसेच पिकाची स्वतःची नैसर्गिक अशी प्रतिकारक शक्ती वाढुन देखिल निमॅटोड नियंत्रणात अप्रत्यक्षरित्या फायदा होतो.