logo

ढोबळी मिरची लागवड पध्दती

ढोबळी मिरची आणि मिरची हि दोन्ही पिके, टोमॅटो, वांगी, आणि बटाटा ह्या सोलॅनेसी (Solanaceae family) परिवारातील पिके आहेत.

मिरची पिकाचे मुळस्थान दक्षिण आणि मध्य अमेरिका आहे. तेथुन ह्या पिकांची लागवड जगभरात पसरली.

तापमान व जमिन

ढोबळी मिरची हे थंड हवामानात येणारे पिक आहे. गोवा, कर्नाटक, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, काही प्रमाणात छत्तिसगढ ह्या राज्यात ढोबळी मिरची ची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

नविन हायब्रीड वाणांच्या सहाय्याने, ढोबळी मिरची हे पिक आता काही प्रमाणात उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागात देखिल घेतले जावु शकते. ज्या वेळेस तापमान हे ३० डि. से. पेक्षा जास्त असते त्यावेळेस ढोबळी मिरची पिकाची शाकिय वाढ जास्त प्रमाणात होते, शेंडाकडील वाढ जोमात होते, पिकावरिल फुलांचा संख्या आणि फळांची संख्या ह्यावर विपरित परिणाम होतो. ढोबळी मिरची पिकास दिवसाचे तापमान ३० डि.से. पेक्षा कमी असलेले मानवते. दिवसाचे तापमान २४ ते ३० डि.से. आणि रात्रीचे तापमान १५ ते १७ डि.से. असल्यास फुलधारणा आणि फळधारणा ह्यात मदत होते.

जास्त थंड तापमानात ढोबळी मिरचीची फळे लहान राहतात, फळांचा नैसर्गिक आकार मिळत नाही तसेच फळे कडक होतात. थंड तापमानात फुलांच्या परागीभवनावर देखिल वाईट परिणाम होत असल्याने फळे चांगल्या दर्जाची मिळत नाहीत.

ढोबळी मिरची पिकास उत्तम निच-याची, आणि सामु ५ ते ६ पर्यंत असलेली माती मानवते.

ढोबळी मिरची पिकाची शेड नेट किंवा पॉली हाऊस मधे लागवड केल्यास ओपन फिल्ड पेक्षा (२० ते २२ टन प्रती हे.) ५ ते ६ पट जास्त उत्पादन (१०० ते १२० टन प्रती हे.) मिळते. शेड नेट किंवा पॉली हाऊस मधिल ढोबळी मिरची जास्त दिवस उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. अशा प्रकारच्या प्रोटेक्डेट (संरक्षित) शेती मधे ढोबळी मिरची चे पिक १० महिन्यांपर्यंत घेता येते, जे ओपन फिल्ड मधे शक्य होत नाही.

शेड नेट किंवा पॉली हाऊस मधिल पिकास रसशोषक किडींचा तसेच विविध रोगांचा देखिल कमी प्रमाणात सामना करावा लागतो.

Anthracnose.
Anthracnose.

लागवड आणि काळजी

ढोबळी मिरची पिकाची लागवड रोपांपासुन पुर्नलागवड पध्दतीने केली जाते. नसर्री मधुन आलेल्या रोपांची लागवड केल्यानंतर त्या रोपांस ईमिडाक्लोप्रीड ७० टक्के (५० ते ६० ग्रॅम प्रती एकर) तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड (२०० ते २५० ग्रॅम प्रती एकर) च्या द्रावणाची ड्रेंचिंग करावी.

ढोबळी मिरची च्या आज बाजारात अनेक हायब्रीड जाती उपलब्ध आहेत. त्यात इंद्रा हा वाण सर्वाधिक लोकप्रिय असा वाण आहे.

इंद्रा

इंद्रा हा वाण मध्यम उंच वाढणारा वाण आहे. ह्या रोपाची पाने दाट असतात ज्यामुळे फळांना एक प्रकारे संरक्षण देखिल प्राप्त होते. फळ हे पुर्नलागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी लागते. फळाचा रंग गर्द लाल, सरासरी वजन १७० ग्रॅम आणि फळांस ३ ते ४ लोब्स असतात. फळाची साठवणुक क्षमता चांगली आहे.

तसेच लारियो, यमुना,बॉम्बे, ट्रिपल स्टार, नताशा, इन्स्पिरेशन, पसारेला (लाल), सनीज, स्वर्णा हे ह्या शिवाय इतर देखिल वाण उपलब्ध आहेत.

ओरोबेली

हा पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरची चा वाण आहे. ह्या वाणास थंड हवामान मानवते.

बाचता (पिवळी) अशा जात उपलब्ध आहे.

ढोबळी मिरचीचे एक एकर क्षेत्रात १६,००० ते २०,००० रोप बसतात. एक वर्ग मिटर क्षेत्रात ५ ते ६ रोप असाल्यास जास्त उत्पादन मिळण्यात मदत मिळते. बेड पध्दतीनुसार लागवड केल्यास एक बेड वरिल लागवडीचे अंतर हे दोन रोपात ३० सेमी. रोपांच्या दोन ओळीत ४५ से.मी. आणि अशा दोन बेड मधिल अंतर हे १.५ मिटर (१५० से.मी.) असावे.

ढोबळी मिरची पिकास शेंडा खुडण्याची किंवा पिचिंग (Pruning) करण्याची पध्दत आहे. रोप लागवडी नंतर ५ ते ६ डोळ्यांपर्यंत वाढल्या नंतर शेंडा खुडला जातो, (साधारणपणे १ फुट उंचीचे रोप) त्यानंतर वाढणा-या दोन सशक्त फांद्या वाढु दिल्या जातात, आणि कमजोर फांद्या काढुन टाकल्या जातात. ढोबळी मिरची पिकास अनेक उप फांद्या येत असतात, त्यापैकी कमजोर असलेल्या आणि जास्त गर्दी होईल अशा प्रकारे वाढणा-या फांद्या वेळोवेळी काढुन टाकव्यात. शेंडा खुडत असतांना, (पिचिंग किंवा प्रुनिंग) डोळ्यापासुन ४ ते ६ मिमी लांब उंचीवर शेंडा खुडावा, तसे न केल्यास जास्त अंतर ठेवुन केलेली पिचिंग त्या फांदीच्या मरण्यास कारणीभुत ठरते.

पिचिंग करण्यासाठी वापरले जाणारी कात्री हि कॉपर ऑक्सिक्लोराईड (२.५ ते ४ ग्रॅम प्रती लि.) द्रावणात बुडवुन वापरावी, जेणे करुन पिकावर जखम झालेल्या भागातुन हानीकारक रोग प्रवेश करणार नाहीत.