logo

सेंद्रिय कर्ब | Soil Organic Carbon

सेंद्रिय कर्ब कमी म्हणुन आपल्या पैकी अनेक शेतकरी हे चिंता करित असतात. या चिंतेचे भांडवल करुन आज बाजारात अनेक अशी उत्पादने आहेत जी जमिनीतील संद्रिय कर्ब वाढविण्यासाठी विकली जात आहेत.

अनेकांना सतावणारा हा सेंद्रिय कर्ब नेमका का तपासला जातो, आणि त्याचे महत्व काय हे आपण आता जाणून घेवु या.

या आधी आपण मातीचे प्रकार आणि त्यातील कणांचे प्रकार यांचा अभ्यास केला, ज्यात सेंद्रिय पदार्थ यांचे बाबत आपण थोडी फार चर्चा केली आहे.

सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जाणुन घेण्यासाठी तपासला जाणारा एक मुद्दा आहे. वास्तविक पाहता सेंद्रिय कर्ब हा पिक, सुक्ष्म जीव तसेच इतर सजिव जे जमिनीत राहतात त्यांच्या साठी खाद्य म्हणुन अजिबात उपयोगी नाही.

सेंद्रिय कर्ब जाणुन घेण्यासाठी आपणास कर्ब काय हे आधी जाणुन घ्यावे लागेल, कर्ब म्हणजे कार्बन (C).

वनस्पती हवेतुन कार्बन डाय ऑक्साईड शोषुन घेवुन, प्रकाश संश्लेषण क्रिये व्दारे त्याचे रुपांतर सेंद्रिय कर्बात करतात. अधिक सुक्ष्म स्तरावर बोलावयाचे झाल्यास सुक्रोज, ग्लुकोज, वै सारख्या शर्करे मध्ये, आणि त्यापासुन नंतर सेल्युलोज, स्टार्च, लिग्निन सारख्या क्लिष्ट परंतु कार्बन युक्त पदार्थांत, वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड चे रुपांतर करित असतात.

तसेच जमिनीतील सुक्ष्म जीव, तसेच गांडुळ वै. वनस्पतीच्या मृत अवषेशांवर प्रक्रिया करुन जमिनीत सेंद्रिय कर्ब तयार करतात.

सेंद्रिय कर्ब हा सुक्ष्मजीवांशिवाय जमिनीत तयार होत नाही. तसेच सुक्ष्मजीव सेंद्रिय कर्बाचा वापर हा उर्जा स्रोत म्हणुन देखिल करित असतात, मात्र त्यांच्या मृत्यु नंतर पुन्हा ते जमिनीत सेंद्रिय कर्ब टाकीत असतात. हा सेंद्रिय कर्ब सुक्ष्म जीव जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थांपासुनच मिळवत असतात, या कामात जीवाणू हे केवळ २० ते ३० टक्के ईतके कार्यक्षम ठरतात, तर बुरशी ह्या ४५ ते ५५ टक्के कार्यक्षम ठरतात. जमिनीत केले जाणारे नांगरणी, वखरणी, कोळपणी यामुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात, तसेच त्यासोबत सुक्ष्मजीवांची संख्या देखिल कमी होते, पण या आघातातुन जीवाणू तेवढे वाचतात. हे सेंद्रिय पदार्थ कुजतात म्हणजे त्यांच्यातील अन्न घटक हे पिकांस उपलब्ध होतील अशा स्वरुपात रुपांतरित होतात.

सेंद्रिय कर्ब हा जास्त प्रमाणातील कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी असलेला घटक आहे, पण क्ले जास्त असलेल्या, क्ले लुम मातीत आधीच कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही जास्त असल्याने या गोष्टीचा फारसा लाभ होत नाही, ज्या मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी कमी आहे, त्या मातीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण देखिल कमी आहे हे आपण आधीच बघितले आहे. या अशा मातीत बाजारात मिळणारा सेंद्रिय कर्ब फारसा दुरगामी परिणाम घडवुन आणु शकत नाही.

आपण आधीच बघितले की, जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जाणुन घेण्यासाठी सेंद्रिय कर्ब जाणुन घेतले जाते. जर जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपुर असतिल तर त्यापासुन केवळ सेंद्रिय कर्बच तयार होणार नाही, तर जमिनीतील उपुयुक्त सुक्ष्म जीवांस आणि गांडुळांस खाद्य मिळुन जमिनीचा पोत देखिल सुधारेल आणि जमिन सामु बदलास प्रतिकारक बनेल.

त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी जमिनीत सरळ सरळ सेंद्रिय कर्ब टाकणे हे चुकीचे ठरेल.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थात साधारणतः 58% कार्बन असतो, त्यामुळे सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरुन जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण काढता येते. त्यासाठी सेंद्रिय कर्बाच्या टक्केवारीस १.७२ ने गुणावे.

समजा जमिनीत ०.५ टक्के सेंद्रिय कर्ब असेल तर त्यांस १.७२ ने गुणल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण हे 0.5 X 1.72 = 0.86% इतके येईल. आणि जर माती परिक्षण अहवाल हा जमिनीच्या वरिल १० सें.मी. थरातील असेल आणि मातीची घनता ही जर १.४ ग्रॅ. प्रती घन से.मी. असेल तर १ हेक्टर क्षेत्रात कीती प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतिल ते पुढील प्रमाणे काढता येईल.

10000 X जमिनीचा खोली मिटर मध्ये X मातीची घनता X सेद्रिय पदार्थ टक्केवारी यानुसार वरिल जमिनीत 10000 x 0.1 X 1.4 X 0.86% = 1204 टन इतके सेंद्रिय पदार्थ (७०० मे.टन सेंद्रिय कर्ब) हे एक हेक्टर क्षेत्रात आहेत. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास जमिनीतील (मातीची घनता १.४ असेल तर) केवळ ०.५ टक्के ईतका जरी सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर त्यात १२०४ मे.टन ईतके सेंद्रिय पदार्थ टाकावे लागतिल. मात्र या सेंद्रिय पदार्थांपासुन हवा तितका सेंद्रिय कर्ब मिळण्यासाठी जमिनीतील मातीचा प्रकार, पिक, सुक्ष्मजीव, पाणी, हवा, तापमान ह्या सर्वांचा प्रभाव पडेल.