logo

सलाईन सॉईल

सलाईन सॉईल या मातीस आपण क्षारपड माती म्हणु शकतो. या मातीत सोडीयम, कॅल्शियम, आणि मॅग्नेशियम चे क्लोराईड आणि सल्फेट सोबत क्षार असतात. जसे सोडीयम क्लोराईड, सोडीयम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट.

या मातीचा ईसी ही ४ पेक्षा (ds/m) जास्त असतो, ज्यावरुन हे लक्षात येते की यातील मुक्त असे क्षार जास्त प्रमाणात आहेत. या मातीतील एक्सचेंजेबल सोडीयम परसेंट (Exchangeable Sodium Percent –ESP) १५ % पेक्षा कमी असते, ज्यामुळे या मातीस सोडीक (Sodic) माती म्हणुन ओळखले जात नाही. मातीचा सामु हा भरपुर प्रमाणात क्षार असुन देखिल ८.५ पेक्षा कमी असतो. हे क्षार पांढ-या रंगाचे असल्याने मातीचा वरचा थर हा पांढरा दिसुन येतो.

सलाईन सॉईल मधे सहसा कॅल्शियम सल्फेट (जिप्सम) ( CaSO₄.2H₂O) चे प्रमाण हे जास्त असते.

अशा जमिनीत पिकाची लागवड केली असता, शेतात काही ठिकाणी जेथे क्षारांचे प्रमाण जास्त आहे तेथे पिकाची वाढ खुंटलेली दिसुन येते, किंवा जास्त प्रमाणात क्षार असतिल तर अशा ठिकाणी रोप जगतच नाही. शेतात पिकाची वाढ एकसमान दिसुन येत नाही. कमी प्रमाणात क्षारता असेल तर, पिकाची पाने हि पानांच्या नैसर्गिक हिरव्या रंगाची न दिसता ती ,गर्द हिरवी, निळसर हिरवी दिसतात. तसेच पानांचा आकार हा लहान राहतो.

ज्या पिकांस खोड आहे अशा पिकांच्या पानांवर क्षार विषबाधेची लक्षणे दिसतात. ज्या पिकांस खोड नाही, अशा पर्णयुक्त पिकांस अशी लक्षणे दिसुन येत नाहीत.

मातीची क्षारता मोजण्यासाठी EC (ईलेक्ट्रिकल कंडक्टीव्हीटी) काढली जाते. यासाठी ज्यावेळेस लॅब मधे सॅम्पल येते त्यावेळेस, मातीची ठरावीक मात्रा घेवुन त्यात पाणी टाकुन त्याची पेस्ट बनवली जाते, नंतर यातील द्रव भाग घेवुन त्याची ईलेक्ट्रिकल कंडक्टिव्हीटी ही कंडक्टिव्हीटी मिटर वर काढली जाते.

प्रत्यक्ष शेतीतील परिस्थिती मधिल मातीच्या पाणी धरुन ठेवण्याच्या सर्वाधिक क्षमतेच्या पातळीवर लॅब मधिल ई सी ची तुलना केल्यास ती केवळ अर्धी (१/२) ईतकी असते, तर माती कोरडी असतांनाच्या पातळीशी तुलना केल्यास लॅब मधिल ई सी हा केवळ एक चर्तुथांश इतकाच असतो.

फुड आणि अँग्रीकल्चर ऑरगनायजेसन नुसार विविध ई सी पातळीचा पिकाच्या वाढीवर काय परिणाम होतो ते खालिल तक्त्यात दिलेले आहे.

क्षारता वर्गिकरण ई सी (ds/m) पिकाच्या वाढीवरिल परिणाम
नॉन सलाईन ० – २ पिकावरिल परिणाम नगण्य
किंचित क्षारयुक्त २ – ४ संवेदनशील पिकांचे उत्पादन कमी होते.
मध्यम क्षारयुक्त ४- ८ बहुतेक पिकांचे उत्पादन घटते.
जास्त क्षारता ८ – १० केवळ सहनशिल पिकांचे उत्पादन मिळते.
अती जास्त >१० फार कमी सहनशिल पिकांचे उत्पादन मिळते.

मातीचा क्षारता कमी करण्यासाठी, त्या मातीत नेमके कोणते क्षार आहेत आणि ते किती प्रमाणात आहेत हे कळण्यासाठी त्यातील कॅल्शियम,सोडीयम, मॅग्नेशियम, क्लोराईड आणि सल्फेट चे प्रमाण माहीत असणे गरजेचे आहे. याशिवाय एस.ए.आर.(SAR) म्हणजेच मातीचा सोडीयम अँबसॉर्पशन रेशो माहीत असणे गरजेचे आहे.

सोडीयम अँबसॉर्पशन रेशो म्हणजे मातीच्या सुक्ष्म कणांवर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम च्या तुलनेत किती प्रमाणात सोडीयम धरुन ठेवला जातो.

या मातीच्या सुधारणे साठी जमिनीतुन आणि जमिनीवुरन पाणी वाहुन जाणे (Leaching) हि उपाययोजना आहे.

या अशा मातीत भात,ऊस, बार्ली, ओट, ल्युसर्न, इंडियन क्लोवर, आणि बरसीम हि जास्त क्षारांस सहनशील पिके घेता येतिल. तसेच एरंडी, कापुस, ज्वारी, बाजरी, मका, मोहरी, गहु ही मध्यम प्रमाणातील क्षारांस सहनशील पिके घेता येतिल.

कडधान्ये, वटाणे, सनहेम्प, हरभरा, तीळ हि क्षारांस कमी प्रमाणात सहनशील असलेली पिके घेवु नयेत.