उन्हाळ्यात पिकांवरील किड नियंत्रण – प्रभावी उपाय आणि तंत्रज्ञान
उन्हाळ्यात पिकांवरील किड नियंत्रण – प्रभावी उपाय आणि तंत्रज्ञान
उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे पिकांमध्ये ताण निर्माण होतो, ज्यामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच, उन्हाळ्यात पिकांवर जीवाणूजन्य (बॅक्टेरियल) आणि विषाणूजन्य (व्हायरस) रोगांचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. किडींच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे उन्हाळ्यात कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात फवारणीतील प्रमुख अडचणी
- औषधांचे हवेत उडून जाणे – जास्त तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे फवारणी करताना औषधांचे मोठे प्रमाण हवेत वाफ होऊन उडून जाते.
- औषधांची प्रभावीता कमी होणे – उच्च तापमानामुळे फवारणीतील घटक लवकर निष्क्रिय होतात, ज्यामुळे किडींचे नियंत्रण योग्य प्रकारे होत नाही.
- फवारणीची वेळ ठरवणे – योग्य तापमान आणि आर्द्रता असताना फवारणी करणे आवश्यक आहे, अन्यथा औषधांचा प्रभाव कमी होतो.
उन्हाळ्यात एकात्मिक किड नियंत्रणाचे प्रभावी उपाय
1. डेल्टा टी मोजून फवारणी करणे
डेल्टा टी म्हणजे वातावरणातील तापमान आणि हवेतील आर्द्रतेच्या गुणोत्तरावर आधारित एक मोजमाप आहे, जे फवारणीची योग्य वेळ ठरवण्यासाठी उपयुक्त ठरते.
- आदर्श डेल्टा टी: २ ते ८ च्या दरम्यान
- अत्यावश्यक परिस्थितीत: १० पर्यंत डेल्टा टी असेल तरीही फवारणी करता येते.
- उच्च तापमानात (१२ पर्यंत डेल्टा टी असताना): जाड थेंब (coarse spray) निर्माण करणाऱ्या पंपाचा वापर करणे.
2. कीड नियंत्रणासाठी विविध सापळ्यांचा वापर करणे
उन्हाळ्यात रासायनिक उपायांच्या मर्यादा लक्षात घेता खालील एकात्मिक उपाय प्रभावी ठरू शकतात –
- पिवळे किंवा निळे चिकट सापळे – रसशोषक किडींसाठी (जसे की मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी) पिवळे तर तुडतुडे आणि फुलकिड्यासाठी निळे चिकट सापळे लावावेत.
- कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) – पतंग आणि अळी वर्गीय किडींच्या नर किडींना आकर्षित करून नियंत्रित करण्यासाठी कामगंध सापळे उपयोगी ठरतात.
- प्रकाश सापळे – रात्री सक्रिय होणाऱ्या पतंग आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे बसवावेत.
3. फवारणीची योग्य वेळ निवडणे
- सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४:३० नंतर फवारणी करावी, कारण याच वेळी रसशोषक व अळी वर्गीय किडी अधिक सक्रिय असतात.
- या वेळेत हवेतील आर्द्रता तुलनेने अधिक असल्याने फवारणीतील औषधांचे हवेत उडून जाण्याचे प्रमाण कमी होते आणि परिणामकारकता वाढते.
4. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय
- शेताच्या कडेने हिरवळ (जिवंत कुंपण) लावणे – शेवरीसारख्या हिरव्या वनस्पतींचा उपयोग करून तयार केलेले नैसर्गिक कुंपण शेतातील तापमान कमी करण्यास मदत करते.
- नैसर्गिक मल्चिंगचा वापर – पानांचे आच्छादन (mulching) केल्याने जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि पिकाच्या आसपासचे तापमान नियंत्रित राहते.
- सेंद्रिय पदार्थांचा वापर – सेंद्रिय पदार्थ वापरल्याने मातीतील जीवाणू सक्रिय राहतात आणि पिकाची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
निष्कर्ष
उन्हाळ्यातील किड नियंत्रणासाठी पारंपरिक रासायनिक फवारणीपेक्षा एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती अधिक प्रभावी ठरतात. पिवळे व निळे चिकट सापळे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे आणि योग्य फवारणी वेळ यांचा योग्य वापर केल्यास किड नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते.
शेती अधिक उत्पादनक्षम आणि पर्यावरणस्नेही करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करा!