logo

बुरशी - म्हणजे काय? कशी तयार होते?

जीवाणू हे एकपेशीय, अतिशय साधी, सोपी पेशी रचना असलेले प्रोकॅरियोटिक सुक्ष्म जीव आहेत, तर बुरशी ह्या बहुपेशीय (आणि यीस्ट सारख्या बुरशी एकपेशीय), पेशीतील जवळपास सर्वच घटक असलेल्या युकॅरियोटिक गटातील सुक्ष्मजीव आहेत.
सर्वच जीवाणू हे डोळ्यांनी अजिबात दिसत नाहीत तर काही बुरशी ह्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतात. मायकोरायझा किंवा व्हॅम हे त्याचे उत्तम उदाहरण.

बुरशी ह्या युकॅरियोटिक गटातील पेशी असलेल्या सुक्ष्मजीव आहेत हे आपण आता जाणतोच, मात्र मानव, प्राणी आणि वनस्पती हे देखिल ह्याच युकॅरियोटिक गटातील पेशींपासुन बनलेले आहेत. पेशीं मधिल हि समानता असल्याने बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणात काही प्रमाणात अडचणी देखिल येतात.

वातावरणातील उत्तम सफाई करणारे कार्यकर्त्या बुरशींच असतात. जमिनीतील अनेक सेंद्रिय घटक कुजविण्याची शक्ती केवळ बुरशींमध्येच आहे. झाडांच्या खोडात असलेले सेल्युलोज सारखे अती क्लिष्ट घटक कुजविण्याची क्षमता बुरशींमध्ये असते. बुरशी ह्या पिकासोबत उपयुक्त ठरेल असा सहवास करुन देखिल राहतात, तर काही परजीवी असतात ज्यांचे मुळे विविध रोग होतात. ह्यातील काही परजीवी बुरशी किडिंना मारत असल्या कारणाने उपयोगी देखिल ठरतात.

अनेक वर्ष तर बुरशींना वनस्पतींच्या गटातच मोडले जात होते, वनस्पतींप्रमाणे बुरशी देखिल एका ठिकाणाहुन दुसरीकडे जावु शकत नाहीत आणि दोघांच्या पेशी रचनेत असलेल्या साधर्म्यामुळे कदाचित असे केले गेले असेल.

बुरशीचे स्पोअर्स सर्वप्रथम गिंबास्टा डेला पोर्टा ह्या ईटालियन शास्रज्ञाने १५८८ साली बघितले. बुरशीचे स्पोअर्स डोळ्यांनी स्पष्ट दिसतात, पिकावरिल डाऊनी मिल्ड्यु, भुरी वै. चे स्पोअर्स आपण देखिल अनेक वेळेस बघितले आहेतच. ह्या शास्रज्ञाने जेव्हा ते स्पोअर्स रुजवुन वाढवीलेत तेव्हा, ज्या बुरशीपासुन स्पोअर्स मिळवले होते तीच पुन्हा हुबेहुन तयार झाल्याची त्याने नोंद केली होती. मानवी ईतिहासातली ही पहिला घटना होती, ज्यावेळेस बुरशी नावाचा एखाद सजिव अस्तित्वात आहे हे मान्य करण्याची सुरवात झाली होती. त्यानंतर क्रिस्टन हेन्री ह्याने बुरशींचे वर्गिकरण केले, जे २० व्या शतकापर्यंत मान्य केले जाते होते. त्यात त्यानंतर अनेक सुधारणा होत जावुन सध्याचे वर्गिकरण अस्तित्वात आले आहे. आज देखिल त्यात सुधारणा होत आहेतच. पृथ्वीवर अंदाजे ५० लाख ईतक्या प्रकारच्या विविध बुरशी आहेत असा अंदाज आहे, ज्यापैकी आपण केवळ १ लाख बुऱशींचे वर्गिकरण करु शकलो आहोत.

बुरशी ह्या जीवाणूंच्या तुलनेत कमी सामु असला तरी देखिल तशा वातावरणात वाढु शकतात. क्लिष्ट कर्बोदके (कार्बोहायडेट्रेस), जसे सेल्युलोज, लिग्निन वै. सारखे पदार्थ जे जीवाणू अन्नाचा स्रोत म्हणुन वापरु शकत नाहीत त्या अन्नाच्या स्रोतावर उपजिवीका करण्याची देखिल बुरशींच्या मध्ये क्षमता असते. जीवाणूंपेक्षा बुरशींची नायट्रोजन ची गरज देखिल कमी असते.