logo

बुरशीची रचना आणि वाढ

बुरशी हि कोळ्याच्या जाळ्यातील धाग्या प्रमाणे दिसणा-या मायसेलियम च्या स्वरुपात वाढतात. हे मायसेलियम आपणणास डोळ्यांनी दिसुन देखिल येतात. उदाहरणार्थ ट्रायकोडर्माची वाढ हिरव्या रंगाची दिसुन येते, तर व्हट्रिसिलयम ची मिलिबग वरिल वाढ हि पांढ-या रंगाची दिसुन येते. मायसेलियम हे एक प्रकारे बुरशीच्या वाढीसाठी अन्न जमा करणारा एक अवयवच असतो. मायसेलियम च्या आत, एकमेकांशी जोडलेल्या अनेक पेशींची रांग असते. ईतर सजिवांप्रमाणे मायसेलियम मधिल पेशी ह्या पुर्णपणे पेशी भित्तिकेने संरक्षित नसतात. दोन पेशी ज्या ठिकाणी जोडल्या जातात त्याठिकणी काही जागा हि अन्नरसाच्या, मायटोकॉन्ड्रिया, डिएनए वै. च्या वहनासाठी मोकळी सोडलेली असते. ह्या मोकळ्या सोडलेल्या जागा म्हणजे एकप्रकारची सछिद्र अशी भिंतच असते, किंवा ह्याला आपण गाळणी मध्ये असतात तशी छिद्रे देखिल म्हणु शकतो. ह्या प्रकारच्या बुरशींना सेप्टेट बुरशी किंवा हायपी म्हणतात. तर काही प्रकारच्या बुरशींमध्ये दोन पेशी ह्या कोणत्याही प्रकारच्या सछिद्र किंवा अछिद्र भित्तिकेने जोडलेल्या नसतात.

मायसेलियम त्यांच्या भोवतालच्या सेंद्रिय पदार्थांवर प्रक्रिया करु शकतील अशी अनेक रसायने स्रवत असतात. ह्या रसायनांमुळे सभोवतालचे क्लिष्ट स्वरुपातील अन्न पदार्थ, बुरशीसाठी उपयोगी पडतील अशा स्वरुपात रुपांतरित होत असतात. ह्या पचलेल्या अन्नाचे शोषण, मायसेलियम च्या मार्फत केले जाते.

मायसेलियम हे अनेक धाग्यांपासुन तयार होत असते, ह्यातील एक धाग्यास हायपी म्हणुन ओळखतात. दुस-या मार्गाने सांगावयाचे झाल्यास अनेक हायपिच्या समुहास मायसेलियम म्हणतात. हे हायपी होस्ट (ज्याच्यावर बुरशी उपजीवीका करतात) च्या आत शिरतात. अशा प्रकारे होस्ट च्या पेशी भेदुन आत शिरण्यासाठी ह्या हायपी १२०० पी.एस.आय. ईतकी प्रचंड शक्ती त्या पेशींवर वापरत असतात. अशा प्रकारे शक्तीशाली बळाचा वापर करुन हायपी होस्ट पेशीच्या आत शिरुन त्यातील अन्नरस मिळवत वाढते. १२०० पी.एस.आय. म्हणजे 84 किलो प्रती चौरस सेंटीमीटर (84kg/cm²). आकाराने लहान असली तरी देखिल बुरशी किती शक्तीशाली आहे ह्याची कल्पना आपणास आली असेलच. साधारणतः इन्डोफायईटिक म्हणजेच होस्ट च्या शरीरीतील पेशींच्या आत जावुन वाढणा-या बुरशी अशा प्रकारे बळाचा वापर करुन होस्ट च्या आत शिरत असतात.

मायसेलियम त्यांच्या पेशीत हवा तो बदल करुन एखादा नविन प्रकारचा अवयव देखिल विकसित करतात. परभक्षी बुरशींच्या व्दारा रस शोषण करण्यासाठी हिस्टोरिया नावाच्या अवयवात विकसित होतात. हे हिस्टोरिया म्हणजे ज्युस पिण्याचा एक प्रकारचा स्ट्रॉ असतो, ज्याच्या व्दारे बुरशी पिकातील, अथवा किड्यांतील रस शोषण करत असते.

व्हॅम म्हणजेच मायकोरायझा बुरशी हि हिस्टोरिया सारखाच अवयव तयार करते ज्यांस अर्बीस्क्युलर असे म्हणतात. हे अर्बीस्क्युलर पिकाच्या मुळांच्या आत असलेल्या रसवाहिन्यांच्या आत शिरतात, रस वाहीन्यांना इंग्रजीत व्हॅस्क्युलर (सिस्टिम) म्हणतात. ह्या अर्बीस्क्युलर मुळेच ह्या बुरशीच व्हॅस्क्युलर अर्बीस्क्युलर मायकोरायझा असे नाव ह्या बुरशीस मिळाले आहे. व्हॅम हि सहजीवी आणि उपयुक्त बुरशी आहे, जी वनस्पतींच्या मुळांवर वाढते. मुळांकडुन मिळणा-या अन्नरसाच्या मोबदल्यात हि बुरशी पिकांस जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता करुन देत असते.

बुरशीच्या पेशी भित्तिकेत कायटिन (चिटिन असा देखिल उच्चार करतात) असते. ह्या कायटिन मुळे बुरशीला सभोवतालच्या हानीकारक वातावरणापासुन संरक्षण मिळत असते. कायटिन पासुन बनलेल्या पेशी भित्तिका ह्या अनेक प्रकारच्या किड्यांमध्ये देखिल आढळुन येतात.

बुरशीची वाढ होत असतांना एका ठराविक वेळेस बुरशी तीच्या पुर्नउत्पादनाची सुरवात करते. बुरशीचे प्रजनन हे लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही पध्दतीने होत असते. ज्यावेळेस वातावरण हानीकारक असते त्यावेळेस बुरशी लैंगिक पध्दतीने प्रजनन करतात, असे सहसा आढळुन येते. ज्यावेळेस वाढीसाठी परिस्थिती पोषक असते त्यावेळेस बुरशी अलैंगिक पध्दतीने वेगात प्रजनन करतात. अलैंगिंक पध्दतीत स्पोरॅन्जीयम नावाचा एक अवयव किंवा छोट्या आकाराची पिशवी बुरशीच्या विकसित हायपी च्या टोकाशी तयार होते, ज्यात असंख्य सुक्ष्म असे स्पोअर्स तयार होत असतात. स्पोअर्स पुर्णपणे तयार झाल्यानंतर हि पिशवी फाटते आणि त्यात असलेले स्पोअर्स हे हवा, पाणी, प्राणी ह्यांच्या सारख्या बाह्य वस्तुंच्या सहाय्याने एका ठिकाणाहुन दुसरी कडे वाहुन नेले जातात.