logo

तोंडली

तोंडली हे एक वेलवर्गिय पिक आहे. बहुवार्षिक असलेले हे पिक साधारणतः २० मीटर उंची पर्यंत वाढु शकते. पिकाचे आयुष्यमान हे ३ ते ४ वर्षांचे असते. ह्या पिकाचे तळा कडील, जमिनी जवळील खोड हे पिकाच्या वयानुसार कडक, लाकुड वर्गिय होत जाते. तोंडली पिकास नर आणि मादी फुल हे वेगवेगळे असतात. नर फुलांचा देठ हा १ ते ७ सें.मी. लांब असतो, तर मादी फुलांचा देठ हा २.५ से.मी. लांब असतो. मादी फुलांत तिन किंवा चार स्रिकेंसर असलेले असे दोन प्रकारचे फुल असते. फुल रात्रीच्या वेळेस उमलते. फुलांचा रंग पांढरा असतो.

ह्या पिकास थंड हवामान मानवत नाही. पाण्याचा चांगला निचरा होणारी, हलकी जमिन पिकासाठी योग्य ठरते. हे पिक जास्त तापमान देखिल सहन करु शकते. आंतरपिक, बांधावरचे पिक, आणि काही ठिकाणी मुख्य पिक म्हणुन देखिल ह्या पिकाची लागवड होते. तोंडली पिकाची लागवड काडी लावुन केली जाते, १० ते २५ सें.मी. लांबीचा काडी ज्यावर ४ ते ५ डोळे असतात, अशी काडी लागवडीसाठी योग्य ठरते. तसेच बियाण्यापासुन देखिल ह्या पिकाची लागवड केली जाते. पिकाची लागवड हि जुन-जुलै आणि जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात केली जाते. लागवडी नंतर पहिले फळ साधारणतः ९०-१२० दिवसांत काढणीस येते. मोठ्या प्रमाणात फळे उन्हाळ्यात मिळतात. पिक थंडीच्या काळात आणि भरपुर पावसात सुप्तावस्थेतच असते. अशा वेळेस भरपुर प्रमाणात फळ काढणीनंतर जमिनीपासुन ६ ते ८ मीटर अंतरच्या वरिल वेल कापुन टाकला जातो, केवळ सशक्त आणि जाड काड्या ठेवल्या जातात. उपयुक्त वातावरणात अशा काड्यांना मोठ्या प्रमाणात फळ धारणा होते.

ह्या पिकाच्या केरळ विद्यापिठाने सुलभा नावाची एक जात विकसित केली आहे जी हेक्टरी ६० टना पर्यंत उत्पादन देते. इंदिरा कुंदरु ५ आणि इंदिरा कुंदरु ३५ ह्या देखिल जाती उपलब्ध आहेत. एरवी स्थानिक जातीपासुन पिकापासुन १० ते १५ टन प्रती हेक्टर इतके उत्पादन मिळते. नर आणि मादी वेलांचे प्रमाण 1:10 ह्या प्रमाणात ठेवण्याची देखिल शिफारस केली जाते. पिकाची लागवड हि २ x २ मीटर अथवा २.५ x २.५ मीटर अंतरावर करावी. वेल वाढविण्यासाठी, कारले, गिलके, भोपळा या पिकाप्रमाणे मंडप तयार करुन घ्यावा. पिक लागवडीनंतर काढणीस ९० ते १२० दिवसांत येते, पिकाचा फळांचा कालवधी संपल्यानंतर त्यास हलकी छाटणी करुन केवळ सशक्त काड्या ठेवतात.

िकाची उत्पादन क्षमता भरपुर असल्याने लागवडी पुर्वी १ मीटर आकाराचे खड्डे खोदुन त्यात शेणखत ५ किलो, निंबोळी पेंड २ किलो, गांडुळ खत ५ किलो आणि गरजेनुसार मँन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड, व थायमेट २० ते ५० ग्रॅम घेवुन खड्डे भरुन घ्यावेत. रासायनिक खतांसाठी सिंगल सुपर फॉस्फेट २ ते ३ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश २ ते ३ किलो देखिल त्यात वापरता येण्यासारखे आहे.

पिक, शेतात स्थिर झाल्यानंतर पिकास अमोनियम सल्फेट २० किलो प्रती एकर, तसेच झिंक सल्फेट ५ ते १० किलो, व फेरस सल्फेट ५ ते १० किलो प्रती एकर ह्या प्रमाणात द्यावे. ह्याच वेळेस जमिनीतुन ईमिडाक्लोप्रीड (७० टक्के) ५० ते ७० ग्रॅम, किंवा एसिटामॅप्रीड १०० ते १५० ग्रॅम ह्या प्रमाणात खोडाजवळ पाणी करुन टाकावे, जेणे करुन ते मुळांव्दारे शोषुन घेतले जाईल.

जर पिकाची वाढ कमी प्रमाणात जाणवत असेल तर वरिल खते १० ते १५ दिवसांनी पुन्हा द्यावीत.

लागवडीनंगर ३० ते ४० दिवसांनी पिकास डि ए पी ५० किलो, आणि एम ओ पी ५० किलो ह्या प्रमाणात भरखत द्यावे.

पिक फुलोरा अवस्थेत असतांना जर शेतात ड्रिप असेल तर ७ दिवसांच्या अंतराने १२-६१-०० हे विद्राव्य खत २ वेळेस द्यावे. सोबत बोरॉन २५० ग्रॅम घ्यावे. बोरॉन चा वापर एकदाच करावा.

फळ तयार होत असतांना १३-००-४५ हे विद्राव्य खत ५ किलो ह्या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळेस द्यावे. ह्या दरम्यान मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्यांची एक किंवा दोन फवारणी घेता येईल.

ज्या शेतात ड्रिप नाही तेथे वरिल काळात शिफारस केलेली विद्राव्य खते फवारणीतुन वापरावीत.

फळ काढणीचा काळ संपल्यानंतर पिकाच्या छाटणी पुर्वी १० ते १५ दिवस आधी पिकाचा थकवा काढण्यासाठी डि ए पी २५ किलो आणि एम ओ पी २५ किलो द्यावे. त्यानंतर छाटणी करुन घ्यावी. पिकास नविन बहार येत असतांना वरिल प्रमाणे अमोनियम सल्फेट पासुन पुन्हा सुरवात करावी.