logo

हवामान, लागवड आणि जमिन

पपई पिकास पाण्याच उत्तम निचरा होणारी जमिन मानवते. जास्त प्रमाणात पाणी साचुन राहणा-या जमिनीत रोपांची मर होण्याची समस्या जास्त प्रमाणात जाणवते. पपई पिकास अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन उत्तम सिध्द होते, पिकास सतत आणि जास्त प्रमाणात फळे येत असल्या कारणाने, जमिनीत सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात असणे फायदेशीर ठरते.

पपई पिकास थंडी मानवत नाही. रात्रीचे तापमान १२ ते १४ डि.से. पेक्षा कमी असल्यास उत्पादनावर विपरित परिणाम जाणवतात. पपई पिकास २१ ते २८ डि.से. तापमान उत्तम ठरते. ह्या पेक्षा खुप जास्त प्रमाणात तापमानात वाढ होत असल्यास उत्पादनावर मोठा परिणाम जाणवतो.

पपई ची लागवड करण्यासाठी १ ते १.२ मिटर रुंदीचे आणि ६ ते १२ इंच उंचीचे बेड तयार करुन लागवड केल्यास अतिरक्त पाणी, किंवा पाण्याची टंचाई ह्या पासुन संरक्षण मिळते.

पपई पिकाची लागवड हि जुन-जुलै, फेब्रुवारी – मार्च, तसेच ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात केली जाते.

पपई लागवडीसाठी रोप तयार करुन ४० ते ४५ दिवसांचे रोप लागवडीसाठी वापरले जाते.

पपई ची लागवड खालील प्रमाणे दोन ओळींत व दोन रोपांत अंतर ठेवुन करतात.

दोन रोपांतील अंतर (फुट) दोन ओळीतील अंतर (फुट) रोपांची संख्या प्रती एकर
6 6 1235
5 5 1778

पपई ची लागवड करण्यापुर्वी ६० घन सें.मी. चे खड्डे करुन त्यात २ भाग शेणखत, १ भाग गाळाची माती, १ किलो गांडुळ खत, ५०० ग्रॅम निंबोळी पेंड, १०० ग्रॅम एम-४५, १०० ग्रॅम लिंडेन एकत्र करुन मिश्रण बनवुन भरावे.

बेड तयार करुन लागवड करत असतांना, प्रती एकर ५०० ते ७५० किलो निंबोळी पेंड, १० ते ३० मे.टन पुर्ण कुजलेले शेणखत, ३ ते ५ टन गांडुळ खत, तसेच ५ किलो सल्फर डस्ट (पावडर) आणि त्या सोबत १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश, २५० ते ४०० किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट एकत्र करुन बेड वर एकसमान रितीने परसवुन घ्यावे.

पपई लागवड केल्यानंतर, रोपांना माती अजिबात लावु नये, तसेच पपई च्या रोपांस पाणी देतांना त्याच्या खोडास पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. पपई रोपांना माती लावणे, आणि ड्रिपर रोपाच्या अगदी जवळ असल्यास, रोपावर कॉलर रॉट रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागतो.

पपई पिकाची उन्हाळ्यात लागवड करत असतांना, रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या गव्हाच्या कोरड्या रोपांचा वापर करुन मल्चिंग करावे. प्लास्टिक मल्चिंग चा वापर करत असल्यास ते जास्त मायक्रॉन चे असावे, तसेच मल्चिंग पेपर चा चकाकणारा भाग हा वर असावा. पपई रोपास प्लास्टिक मल्चिंग केल्यानंतर पाणी देतांना गरजेनुसार द्यावे, तसेच रोपावर मल्चिंग पेपर तापल्यामुळे त्याची उब लागणार नाही ह्यासाठी गव्हाच्या तुसाचा वापर करावा अथवा ज्युट चे कापड (गोणपाट) रोपाजवळ टाकावे. हे करत असतांना, रोपास रोगाची लागण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.