logo

पपई लागवड तंत्रज्ञान

पपई पिकचे मुळ स्थान हे दक्षिण मेक्सिको, आणि मध्य अमेरिका मानले जाते. ह्या पिकाची लागवड हि फ्लोरिडा, हवाई, पुर्व अफ्रिका, श्रीलंका, भारत, कॅनरी बेटे, मलेशिया, आणि ऑस्ट्रेलियात तसेच अशियात केली जाते. सध्या पपई पिकाची लागवड हि जवळपास ६० देशात केली जाते.

पपई पिकाची पहिली नोंद सन १५२६ मधे, एका स्पॅनिश ईतिहासकाराच्या नोंदीत सापडते. स्पॅनिश आणि पोर्तुगीज खलाशांनी पपई च्या बिया १५०० ते १६०० च्या शतकात, पनामा, डोमिनिकन रिपब्लिक आणि भारत, फिलिपाईन्स आणि मलेशियात नेल्यात.

भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा पपई उत्पादक देश आहे, जो जगातील एकुण पपई उत्पादनापैकी, ३८.६१ टक्के उत्पादन करतो. गेल्या १० वर्षात जगातील पपई उत्पादन हे ४.३५ टक्के दराने वाढले. जगभरातील पपई उत्पादनात झालेली वाढ हि भारतात होणा-या पपई उत्पादनामुळे झालेली आहे, भारतात सन २००५ साली पपई चे उत्पादन हे २ मिलियन टन होते ते सन २०१० साली ४.७ मिलियन टन इतके झाले, केवळ ५ वर्षात पपई चे उत्पादन दुप्पट झालेले आहे.

जगातील प्रथम क्रमांकाचा पपई उत्पादक देश असुन देखिल भारतातुन होणारी पपई फळांची निर्यात हि मात्र ५.३ टक्के (जागतिल बाजारातील हिस्सेदारी) ईतकी आहे, मेक्सिको जगातील प्रथम क्रमांकाचा पपई निर्यातदार देश असुन त्या देशातुन होणारी पपई ची निर्यात ही जागतिक पपई बाजाराच्या ४० टक्के ईतकी आहे.

भारतातुन अमेरिका (५० टक्के), सिंगापुर (८.३४ टक्के), कॅनडा (५.३० टक्के), नेजरलॅन्डस (४.१८ टक्के), युनायटेड किंगडम (३.२९ टक्के), हाँगकाँग (३ टक्के), ह्या देशात निर्यातीस मोठी संधी आहे (कंसातील आकडे, जगातिल एकुण पपई आयातीपैकी असलेला त्या देशाचा हिस्सा आहे.)

पपई पिकाचे रोप हे वेगात वाढणारे आणि ठिसुळ प्रकाराचे असते. पपई पिकाच्या जुन्या झालेल्या पानांच्या गळण्यातुन तयार होणा-या कडक आवरणामुळे काय ते ह्या पिकाच्या खोडास थोडाफार कडकपणा येतो.

सन २००१-०२ च्या आकडेवारी नुसार, भारतात आंध्र प्रदेश (तेंलगाणा सहित) राज्यात पपई ची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तेथे पपई ची लागवड ११,७०० हेक्टर क्षेत्रावर होते, तर त्यानंतर केरळ (१३२०० हे.), ओरिसा (१०७०० हे.), आसाम (७५०० हे), पश्चिम बंगाल (७२०० हे.), महाराष्ट्र (५८०० हे.) कर्नाटक(३६०० हे.) राज्यात पपई ची लागवड केली जाते. (स्त्रोत – नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, भारत).पपई पिकावरिल फुले -

पपई पिक हे, पॉलीगॅमस म्हणुन ओळखले जाते, ह्या पिकाचे प्रामुख्याने लिंगानुसार तिन प्रकार पडतात, १. केवळ नर फुल असणारे रोप (स्टॅमिनेट) , २. केवळ मादी फुल असणारे रोप (पिस्टलेट) आणि ३. नर व मादी अशी दोन्ही प्रकारची फुले असणारी रोपे (बायसेक्शुयल). ह्या व्यतिरिक्त पपई पिकातील फुलांचे वातावरणानुसार काही अतिरिक्त प्रकार देखिल दिसुन येतात. जास्त तापमानामुळे पिकावर नर फुलांची संख्या वाढण्याचे प्रमाण जास्त असते.

स्टोईरी ने १९४१ साली पपई पिकाचे फुलांच्या अनुसार ५ प्रमुख प्रकार पाडलेत ते पुढिल प्रमाणे –

१. टाईप-१: (पिस्टलेट) ह्या प्रकारातील रोपावर केवळ मादी फुल येते. मादी फुल हे ओव्हरी असलेले आणि ज्यात ५ स्टिग्मा असलेले असे असते.

२. टाईप-२: (हर्माफोरडाईट) ह्या प्रकारातील रोपावर ५ स्टेमन्स आणि ग्लोबोज (म्हणजेच गोलाकार) प्रकारातील ५ कप्पे असलेली ओव्हरी असते.

३. टाईप-३: (हर्माफोरडाईट – कार्पेलॉईड) ) ह्या प्रकारातील रोपावर ६ ते ९ स्टेमन्स आणि ओबडधोबड आकाराचे कप्पे असलेली ओव्हरी असते.

४. टाईप-४ : (हर्माफोरडाईट – ईलॉंगेटा) ह्या प्रकारातील रोपावर १० स्टेमन्स आणि लंबाकार (अंडाकृती आकाराची) ओव्हरी असते.

५. टाईप-४+ : (हर्माफोरडाईट – बॅरन) फुलावर १० स्टेमन्स असतात मात्र, त्यातुन संकर होवु शकत नाही.

६. टाईप ५: स्टॅमिनेट गटातील ह्या फुलात १० स्टेमन्स असतात, ओव्हरी नसते. अशी फुले रोपावर गुच्छ्याच्या स्वरुपात लागतात.

पपई पिकात वरिल प्रमाणे फुलांचे प्रकार असुन, वातावरण आणि हवामानातील बदलांच्या अनुसार काही नर आणि हर्माफोरडाईट फुलांमधे सेक्स रिव्हर्सल देखिल दिसुन येतो.

आपल्या कडे पपई लागवड करित असलेल्या अनेक शेतक-यांना काही रोपांवर अंडाकृती (लंबाकार) आकाराची फळे मिळतात, तर काही फळे हि गोलाकार असतात, वरिल फुलांच्या प्रकारातील टाईप २ आणि टाईप ४ (ईलॉंगेटा) ह्या गटातील फुलांच्या आत असलेल्या ओव्हरीच्या आकारामुळे तशी फळे मिळतात, तर वातावरण आणि हवामानातील बदलांच्या अनुसार फुलांचे प्रकार बदलत असल्या कारणाने, फलित होवु शकतील अशा वरिल प्रकारांपैकी एखादा-दुसार प्रकार शेतातील रोपांवर वाढु शकतो.

पपई पिकावर फुले हि रोपाच्या टोकाकडील भागावर येतात. फुले सकाळी ७ ते ९ ह्या काळात उघडलेली असतात, आणि फुलाचे आयुष्य हे ३ ते ४ दिवस ईतके असते. हर्मोफोरडाईट आणि मादी रोपांवरिल फुलांची संख्या हि २ ते १५ पेक्षा जास्त असु शकते, तर नर रोपांवर मात्र अतिशय जास्त प्रमाणात फुले लागतात.

फुले सकाळी ७ ते ९ ह्या काळात उघडी राहत असली तरी देखिल परागीभवनाची ठराविक वेळ मात्र ज्ञात नाही. पपई पिकात परागकण स्टिग्मावर पडल्यानंतर, परागीभवन २५ तासात पुर्ण होते, असा अंदाज आहे.(कोहेन) पपई पिकात अनेक प्रकारची फुले येत असल्या कारणाने, प्रामुख्याने डायोशियस (नर आणि मादी फुले असलेली रोपे) आणि गायनो-डायोशियस म्हणजे हर्माफोरडाईट आणि मादी फुले असलेले रोप असे दोन सोपे प्रकार आपण लक्षात ठेवु शकतो.

भारतात तैवान रेड लेडी ७८६ ह्या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हि जात गायनो-डायोशियस म्हणजे हर्माफोरडाईट आणि मादी फुले असलेले रोप ह्या गटात मोडते. रेड लेडी ७८६ फळांचे सरासरी वजन हे १ ते ३ किलो पर्यंत असते, रोपावर फळे जमिनीपासुन 6६० ते ८० सें.मी. अंतरापासुन लागण्यास सुरवात होते. मादी रोपांवरिल फळे हि लहान मात्र काहीसी लंबाकार असतात, तर बायसेक्सुयल रोपांवरिल फळे हि लांब-मोठ्या आकाराची असतात. फळांचा वापर हा टेबल पर्पज तसेच प्रोसेसिंग साठी देखिल करता येतो. फळांची साठवणुक क्षमता चांगली आहे.

ह्या शिवाय भारतात,

१. कुर्ग हनी ड्यु – टेबल पर्पज आणि प्रोसेसिंग साठी उपयुक्त. हिरवट पिवळ्या रंगाची आणि अंडाकृती आकाराची फळे, गर नारंगी रंगाचा.

२. पुसा डार्फ – १ ते २ किलो वजनाचे फळ. बुटके रोप, हाय-डेन्सिटि प्लांटिंग साठी उपयुक्त. फळे जमिनीपासुन २५ ते ३० सेमी अंतरापासुनच लागतात.

३. पुसा जायंट – कॅनिंग उद्योगासाठी उपयुक्त वाण, फळांचे वजन २.५ ते ३ किलो.

४. पुसा मॅजेस्टि – पेपेन मिळविण्यासाठी उपयुक्त वाण, फळांचे वजन १ ते १.५ किलो. फळे १४६ दिवसात सुरु होतात.

५. कोईंबतुर १ – रांची ह्या जाती पासुन सिलेक्शन पध्दतीने विकसित केलेला वाण. फळे जमिनीपासुन ६० ते ७० सें.मी. अंतरावर लागण्यास सुरवात होते.

६. पुसा डिलिशियस – फळांचे वजन १ ते २ किलो, फळांचा गर नारंगी पिवळसर आणि चवीस उत्तम.

७. कोईंबतुर २ – पेपेन उत्पादनासाठी उपयुक्त वाण. एका फळांपासुन ४ ते ५ ग्रॅम कोरडे पेपेन मिळते. पेपेन उत्पादनासाठीच कोईंबतुर ५ हा वाण, एका फळापासुन १४ ते १५ ग्रॅम कोरडे पेपेन देण्याची क्षमता ठेवतो.

८. वॉशिंग्टन – ह्या वाणात नर आणि मादी रोप वेगवेगळे असते. फळांचे वजन हे १.५ ते २ किलो पर्यंत येते. फळांचा रंग बाहेरुन हा आकर्षक पिवळा असतो.

९. सोलो – किचन गार्डन साठी उपयुक्त वाण. फळांचा गर हा गर्द गुलाबी असतो आणि फळाची चव ही गोड असते.

१०. तैवान ७८६ – फळे जमिनीपासुन ६० सें.मी. अंतरापासुन लागण्यास सुरवात होते, एका रोपापासुन वर्षाला ३० फळे मिळतात.