logo

हरभरा लागवड पध्दती

दक्षिण पुर्व तुर्की मध्ये सर्वप्रथम हरभरा पिकाची लागवड केली गेली. आज जगात भारत, पाकिस्तान आणि तुर्की मध्ये सर्वात जास्त प्रमाणात हरभ-याची लागवड केली जाते. हरभरा पिकाच्या दोन जाती आहेत. बियांच्या किंवा दाण्यांच्या आकारावरुन या दोन जाती पडतात.

१. काबुली चना (मॅक्रोस्पर्मा) – ह्या हरभ-याच्या जातीचे दाणे हे आकाराने मोठे असतात. (१०० बियांचे वजन हे २५ ग्रॅम पेक्षा जास्त) दाणे आकाराने गोल आणि क्रिम रंगाचे असतात. रोप मध्यम ते मोठे असते. पानांचा आकार देखिल मोठा असतो, फुल पांढ-या रंगाचे असते.

२. देशी चना (मायक्रोस्पर्मा) – या हरभ-याच्या जातीचे दाणे हे आकाराने लहान असतात, तसेच पुर्ण गोलाकार नसुन टोकाकडे काही अंशी निमुळते होत जातात. बियांचा रंग हा क्रिम, काळसर, तपकिरी, पिवळसर किंवा हिरवा असतो. एका शेंग मध्ये १ ते २ दाणे भरतात. रोप छोटे असते आणि पानांचा आकार देखिल लहान असतो.

जमिन आणि हवामान –

हरभरा पिकाची लागवड रब्बी पिक म्हणुन केली जाते. चांगली उगवण होण्यासाठी २८ ते ३३ डिग्री सेल्सियस तापमानाची गरज भासते, अशा तापमानात ५ ते ६ दिवसांत उगवण होते. हरभरा पिकाच्या मुळ्या ह्या सोट-मुळ प्रकारातील असुन, मुख्य मुळांस ३ ते ४ उप मुळ्या फुटतात. हरभरा पिकाचे मुळ जमिनीत १.५ ते २ मिटर खोली पर्यंत वाढते. मुळांवरती रायझोबियम हा सहजीवी जीवाणु गाठी करुन राहतो, ज्यामुळे पिकांस हवेतील मुक्त स्वरुपातील नत्र उपलब्ध होत राहतो. हरभरा पिकाची लागवड, जवळपास सर्वच प्रकारच्या जमिनीत केली जाते. जास्त क्षार असलेल्या जमिनीत लागवड केल्यास दाणे निट पोसत नाहीत.

मिश्र पिक पध्दती –

हरभरा पिकाची गहु पिकासोबत मिश्र पिक म्हणुन लागवड केली जाते. दोन्ही पिकांची १ एकर क्षेत्रात निम्मि निम्मि लागवड केल्यास वापरलेल्या जमिनीतुन जास्तीत जास्त उत्पादन मिळते. मका पिका सोबत देखिल हरभरा पिकाची मिश्र पिक म्हणुन लागवड केली जाते. (मक्याच्या दोन ओळीत ७५ से.मी. अंतर ठेवुन त्या अंतरात हरभरा पिकाच्या दोन ओळी लावल्या जातात.) अशा प्रकारे लागवड केल्यास एकरी मक्याचे २२ क्विंटल उत्पादन मिळल्याची नोंद आहे. (सिंग १९८९) रब्बी हंगामात केवळ मक्याची लागवड न करता मक्याची हरभरा पिकासोबत (७५ सेमी X २५ सेमी) एकास दोन या गुणोत्तरात (मकाच्या दोन ओळीत हरभरा पिकाच्या दोन ओळी) लागवड केल्यास मक्याचे २२ टक्के जास्त उत्पादन मिळते. (क्वयम १९८७)

लागवड –

हरभरा पिकाची ऑक्टोबर च्या मध्या पासुन तर नोव्हेंबर च्या मध्या पर्यंत लागवड केली जाते. या काळाच्या आधी किंवा नंतर लागवड केल्यास उत्पादनात घट येते. महाराष्ट्रात ऑक्टोबर मध्ये केलेल्या लागवडीतुन जास्तीत जास्त उत्पादन मिळते. हरभरा पिकाची जास्त रोपांची संख्या एक एकरात ठेवल्यास त्यापासुन जास्त उत्पादन मिळते. शेखावत आणि शर्मा (१९८६) यांनी केलेल्या संशोधनानुसार जर एक एकरात लागणा-या ३० किलो बियाण्या ऐवजी ६० किलो बियाणे वापरुन उभी आणि आडवी पेरणी करुन लागवड केली, (दोन ओळीतील अंतर २२.५ सेंमी) तर जास्त उत्पादन मिळते असे दिसुन आले आहे. सर्व साधारणपणे १ एकरात १,३२,००० ते १,७६,००० रोप असावे.

देशी चना पिकासाठी दोन ओळीत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवुन पेरणी करावी. तर काबुली चना पिकासाठी दोन ओळीत ४५ सेंमी आणि दोन रोपांत १५ सेंमी अंतर ठेवुन लागवड करावी.