logo Agriplaza Agriculture information

मेटारायझियम

मेटारायझियम अँनासोपिली

(Metarhizium anisopliae )

मेटारायझिम ही जमिनीत वाढणारी बुरशी आहे. सर्व प्रथम ह्या बुरशीचा किटकनाशक म्हणुन वापर करण्याचे श्रेय १८७९ साली ईली मेटिन्कॉफ यांस जाते, ज्याने गहु साठवणुकित गव्हातील किडीच्या नियंत्रणासाठी या बुरशीचा वापर केला होता. बिव्हेरिया बॅसियना मुळे किडिस व्हाईट मस्कर्डाईन हा रोग होतो, तर मेटारायझिम मुळे ग्रीन (हिरवा) मस्कर्डाईन हा रोग होतो. दोन्ही रोग एकाच प्रकारचे आहेत, फरक हा आहे, की, बिव्हेरियाचे कोनिडीया पांढ-या रंगाचे असल्याने किडीच्या मृत्यु नंतर ज्यावेळेस बुरशीचे कोनिडिया किडीच्या शरीरावर वाढतात त्यावेळेस त्यांचा रंग पांढरा दिसतो, तर मेटारायझियम चे कोनिडिया हे हिरव्या रंगाचे असल्याने मेलेली किड हिरव्या रंगाच्या कोनिडियाने वेढलेली दिसुन येते.

मेटारायझिम चे अलैंगिक पध्दतीने तयार झालेले कोनिडिया हे किडिच्या शरिरात जर्म ट्युब तयार करुन प्रवेश मिळवात, आमि त्यानंतर किडीच्या शरीरातील अवयवांवर उपजिविका करतात. किडीचा मृत्यु झाल्यानंतर ज्यावेळेस किडीच्या बाहेर वाढते त्यावेळेस तयार होणा-या हिरव्या कोनिडियामुळे किड हिरवी दिसुन येते. किडीच्या शरीरात ही बुरशी डेक्स्टुरिन्स नावाचे विष देखिल स्रवते ज्यामुळे देखिल किडीचा मृत्यु होतो.

मेटारायझियम चा वापर हा जमिनीतुन तसेच फवारणीतुन देखिल करता येतो. ज्या प्रमाणे बिव्हेरिया थोडे जास्त तापमान असले तरी देखिल तग धरु शकते त्या प्रमाणे मेटारायझियम करु शकत नाही. मेटारायझिम चा प्रभाव हा वाढत्या तापमानानुसार कमी कमी होत जातो. मेटारायझिम च्या कोनिडिया विखुरल्या जाण्यासाठी कमी आर्द्रता गरजेची असते, (५० टक्के पेक्षा कमी), तर कोनिडिया किडीच्या शरीरीवर रुजण्यासाठी जास्त आद्रतेची गरज भासते.

मेटारायझियम जवळपास २०० प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. प्रामुख्याने फुलकिडे, वाळवी, हुमणी, रुट व्हिविल्स, वायर वर्म, खोड पोखरणारी किड यांच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो.

यासुज युनिव्हर्सिटि, यासुज, ईराण येथे केलेल्या संशोधनातुन शास्रज्ञांना असे आढळुन आले की, मेटारायझियम अनासोपिलीच्या वापरातुन हेटोरेडेरा अव्हेनी ह्या निमॅटोडच्या नियंत्रणात फायदा होतो. ही बुरशी निमॅटोड च्या विरोधात कार्य करतील अशी काही एन्झाईम्स स्व्रवुन तसेच निमॅटोड वर वाढुन त्याचे नियंत्रण मिळवुन देते. मेटारायझिमच्या 10³ ते 10⁷ प्रती मिली इतक्या तिव्रतेच्या द्रावणाचा वापर केला असता, निमॅटोड वर १४ ते ४७ टक्के नियंत्रण मिळते.

सदरिल आर्टिकल हे सुक्ष्मजीव – शेती आणि प्रगती ह्या पुस्तकातुन लेखकांच्या पुर्व परवानगी ने घेतलेले आहे. वरिल सोशल मिडिया शेअर लिंक चा वापर करुन हि माहीती शेअर करावी. ह्यात कोणतिही छेडखानी करुन त्यात फेरबदल करुन माहीतीचा प्रसार, वापर करणे हे कॉपी राईट नियमांचे उल्लघंन राहील.