logo

पोटॅश (पालाश) | Potash

पालाश हे अन्नद्रव्य पिकातील जवळपास 60 एन्झाईम्स ची क्रिया सुव्यवस्थित रित्या होण्यासाठी गरजेचे आहे. या एन्झाईम्स ला क्रियाशील करण्याचे कार्य पालाश करते.

प्रकाश संश्लेषण क्रियेत एटीपी तयार होण्यासाठी गरजेच्या क्रियेला कार्यान्वित करण्यासाठी पालाश ची गरज भासते.

पानांवरिल पर्णरंध्रांच्या गार्ड सेल मधे पालाश शिरुन त्यात पाणी भरुन घेते ज्यामुळे पर्णरंध्र उघडतात, आणि पाण्याची कमी असेल त्यावेळेस गार्ड सेल मधिल पालाश बाहेर टाकले जाते ज्यामुळे गार्ड सेल मधिल पाणी देखिल बाहेर जाते, व पर्णरंध्र बंद होते. ज्यावेळेस पिकांस पालाशचा पुरवठा कमी असतो त्यावेळेस हि क्रिया मंदावते किंवा बंद पडते ज्यामुळे पिक पाण्याची ताण सहन करु शकत नाही. त्यामुळे पालाश हे पाण्याचा ताण सहन करण्यात उपयोगी ठरते.

पानांनी तयार केलेले अन्न हे पिकाच्या इतर भागात वाहुन नेण्याचे काम पालाश करते. पालाश ची कमी असल्यास हे अन्न पानात साठवले जाते व ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो.

नायट्रेटस, फॉस्फेटस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँमिनो अँसिडस च्या रस वाहीन्यातील वहनासाठी पालाश गरजेचे अन्नद्रव्य आहे.

पिकात स्टार्च तयार होण्यासाठी पालाश ची गरज भासते, पालाश ची कमतरता असल्यास पाण्यात विरघळणारी कर्बोदके (कार्बोहायड्रेटस) आणि नत्र युक्त पदार्थांची निर्मिती वाढते.

पालाश रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यात देखिल महत्वाची भुमिका पार पाडते.

जमिनीतील मातीच्या कणांत (मिनरल्स) असलेला पालाश हा 90 -98% इतका असतो. फ्लेडस्पर आणि मायका मध्ये असा पालाश जास्त असतो. मातीच्या कणांत असलेला हा क्रिस्टल पालाश पिकासाठी उपयोगी ठरत नाही. ज्यावेळेस ह्या मिनरल्स चे विघटन होते त्यावेळेस हा पालाश सावकाश उपलब्ध होणा-या पालाश मधे रुपांतरित होतो. तर काही पालाश हा पिकास तत्पर उपलब्ध होणा-या स्वरुपात देखिल रुपांतरित होतो.

जमिनीत सावकाश रित्या पिकांस उपलब्ध होणारे पालाश हे क्ले मिनरल्स च्या कणांत दाबले गेलेले असते. हा पालाश स्थिर झालेला पालाश म्हणुन देखिल ओळखला जातो. सध्याच्या माती परिक्षण अहवालात हा पालाश तपासला जात नाही. हा पालाश जमिनीतील पिकांस उपलब्ध होणा-या पालाश चा साठा म्हणुन देखिल कार्य करतो. ज्यावेळेस पिक जमिनीतुन पालाश ग्रहण करुन घेते त्यावेळेस जमिनीतील काही पालाश स्थिर होवुन सावकाश उपलब्ध होणा-या पालाश ची जागा घेतो. ज्यावेळेस जमिनती पाणी नसते त्यावेळेस पालाश अशा रितीने स्थिर होतो, तर पाणी दिल्यानंतर पुन्हा पिकांस उपलब्ध होतो, मात्र दरवेळेस असे होत नसल्याने पालाश खत व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतात. पिकास सावकाश उपलब्ध होणा-या पालाश चे प्रमाण हे १ ते १० टक्के असते.

जमिनीतील पिकास उपलब्ध होणारा पालाश हा क्ले कणांवर चिकटलेला, तसेच पाण्यात विरघळलेला असा असतो. हा पालाश जमिनीत १ ते २ टक्के इतका अल्प असतो.

जमिनीत पाणी असतांना पालाश चे ग्रहण हे जास्त प्रमाणात होते, तर जमिनीत पाणी नसतांना पालाश चे ग्रहण कमी होते, कोरडवाहु पिके संरक्षित पाणी दिल्यानंतर पालाश खतांस जास्त प्रतिसाद देतात ते यामुळेच.

जमिनीच्या कमी तापमानात पालाश चे ग्रहण कमी होते.

ज्या जमिनीची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही कमी असते त्याजमिनीत पालाश युक्त खते वाहुन जाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा जमिनीत पालाश खताची मात्रा विभागुन द्यावी.

पालाश हे अन्नद्रव्य पिकात वहनशिल असे आहे. पालाश ची कमतरता ही जुन्या पानांवर दिसुन येते. पानांच्या कडा पिवळ्या पडतात, तसेच पान लालसर होते.

पालाश युक्त खते ही पिक लागवडी पुर्वी दिल्यास जास्त फायदेशिर ठरतात. पालाश खते जमिनीत गाडुन देणे जास्त फायदेशिर ठरते.

पिक पालाश हे अन्नद्रव्य डिफ्युजन तंत्राने शोषुन घेते.

जमिनीत जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यास पालाश चे शोषण कमी प्रमाणात होते. काही शास्रज्ञांच्या मते पोटॅश व कॅल्शियम आणि पोटॅश व मॅग्नेशियम चे गुणोत्तर हे २ पेक्षा जास्त व १० पेक्षा कमी असावे.

केळी पिकातील पालाश चे महत्व हे अनन्य साधारण असे आहे. २० टन केळी च्या उत्पादनासाठी नत्र हे ७२ किलो, स्फुरद ७ किलो तर पालाश हे ११६ किलो वापरले जाते. मॅग्नेशियम ८ किलो, कॅल्शियम १० किलो वापरले जाते. यातील बहुताश पालाश हे फुलोर अवस्थे नंतर वापरले जाते. केळी पिकांत गर्भ धारणा होत असतांना पालाश ची गरज असते, मात्र फुलोरा होत असतांना हि गरज कमी होवुन, फुलोरा अवस्था पुर्ण झाल्यानंतर ती वाढते.

आधीच आपण बघितले की, पालाश हे स्टार्च च्या निर्मितीमधे महत्वाचे आहे, पालाश च्या उपस्थित स्टार्च ची निर्मिती तसेच पिकातील अन्नाचे वहन हे फळांकडे व इतर भागात होते, पालाश कमी प्रमाणात असले कि, पाण्यात विरघळणारे कर्बोदके आणि नत्र युक्त पदार्थ जास्त प्रमाणात तयार होतात ज्यामुळे फळांचा दर्जा घसरतो.