logo

आले पिकाचे खत व्यवस्थापन

आले लागवड पध्दती

आले ह्या पिकाची लागवड प्रथम ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स ह्या दक्षिण पुर्व देशात केली गेली. ह्या पिकाची जंगली अशी कोणतीही जात नाही, शेती करत असतांना जेव्हा मानव ह्या पिकाच्या संपर्कात आला त्यावेळे पासुन ह्या पिकाची सरळ म्हणजेच कोणत्याही सुधारणा किंवा संकर न करता लागवड केली जाते.

भारत हा जगातील सर्वात मोठा आले उत्पादक देश असुन, भारतात, सन २०१६ साली ११,०९,००० टन आल्याचे उतपादन घेण्यात आले. भारत जगातील सर्वात मोठा आले उत्पादन देश असुन देखिल जगभरातील प्रमुख आले निर्यातदार देशात भारताचा मात्र ७ वा क्रमांक लागतो. निर्यात क्षेत्रात, आले पिकात अजुन देखिल भरपुर संधी उपलब्ध आहेत.

जमिन आणि हवामान

आले लागवडीसाठी उबदार आणि दमट हवामान मानवते. ह्या पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि पिकाच्या वाढीच्या काळात जास्त पाऊस उपयुक्त ठरतो. पिक काढणीच्या आधी, मात्र पिकास कोरडे हवामान गरजेचे ठरते.

पिकासाठी ६ ते ७ दरम्यान सामु असलेली, उत्तम निचरा असलेली आणि जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन उत्तम ठरते.

हवामान बदलामुळे, जगभराती शेती आमि शेतकरी ह्यांच्यावर विलक्षण असा प्रभाव पडतो आहे, नायजेरिया मधिल संशोधन संस्थेने आले पिकाचे उत्पादन आणि पावसाचे प्रमाण ह्या विषयावर अभ्यास केला असता त्यांना असे आढळुन आले की, पावसाचे प्रमाण वाढले असता, आले पिकाचे उत्पादन देखिल वाढते. त्याच प्रमाणे बांग्लादेशात देखिल ह्या बाबतीत जे संशोधन झाले त्यातुन देखिल असाच निष्कर्ष निघाला आहे.

आले पिकास पिकाच्या वाढीच्या काळात मुबलक प्रमाणात पाणी मिळणे गरजेचे असते. भारतात आले पिकाची लागवड हि बागायती आणि पावसाच्या पाण्यावर अवलबुंन राहुन देखिल केली जाते. बागायती पिकात, सप्टेंबर ते डिसेंबर ह्या काळात आले पिकास पाण्याची कमतरता पडु नये ह्यासाठी नियमित पाणी देणे गरजेचे आहे.

लागवड आणि बियाणे

आले पिकाची लागवड हि एप्रिल ते जुन ह्या कालावधीत केली जाते. आले लागवडी पुर्वी जमिन नांगरुन, ढेकळे फोडुन, बेड तयार करुन केली जाते.

आले पिकासाठी बेड तयार करतांना ते १ मीटर रुंद, आणि ३० सें.मी. उंचीचे असावे, बेड वर लागवड करतांना, आले पिकाचे कंद वाढल्यानंतर बेडच्या बाहेर वाढणार नाही ह्यासाठी कंद लावतांना ते बेडच्या बाहेरील बाजु पासुन आत लागवड करावेत. दोन बेड मधिल अंतर ते १.५ ते २ फुट असावे. तसेच दोन रोपातील अंतर हे १ फुट असावे.

लागवडीपुर्वी बेड तयार करतांना, त्यात २५० ते ३५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० ते ७५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश चा वापर (प्रती एकर) करावा, तसेच बेड मधे निंबोळी पेंड ५०० ते १००० किलो, करंज पेंड ३०० ते ५०० किलो ह्याचा वापर करावा. जर शेतात निमॅटोड ची समस्या राहत असेल तर लागवडीचे बेड हे ४० ते ४५ दिवस आधीच तयार करुन त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपर अंथरुन ते उन्हात चांगले तापु द्यावेत आणि त्यानंतर लागवड करावी.

पावसाळ्यात होणार असलेल्या आले लागवडीसाठी मल्चिंग पेपर चा वापर टाळावा. मल्चिंग पेपर वर लागवड केल्यास, जास्त पावसाचे पाणी, पिकासाठी अत्यंत घातक ठरते, आणि पिकावरील मर रोगाचे नियंत्रण करणे कठिण होवुन जाते.

आले लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत. आले लागवडीसाठी कंद निवडतांना तो निरोगी आणि जास्त उत्पादन देणा-या शेतातील असावा. प्रती एकर एकर ६०० ते ७२० किलो (प्रती हेक्टर १५०० ते १८०० किलो) कंद गरजेचे ठरतात. लागवड करतांना कंदाचा आकार हा ५ ते ७ से.मी. असावा आणि त्यावर एक किंवा दोन सशक्त डोळे असावेत, अशा कंदाचे वजन हे सरासरी २५ ते ३० ग्रॅम ईतके असावे.

कंद लागवडीपुर्वी क्लोरोपायरीफॉस किंवा नुवान (२५० ते ५०० मिली प्रती १०० लि. पाणी) आणि ट्रायकोडर्मा च्या द्रावणात बुडवुन, सावलीत वाळवुन लागलीच वापरावे.

काढणी आणि उत्पादन

आले पिक लागवडी पासुन ८ महिन्यांना काढणीसाठी तयार होते. लागवडी पासुन साधारणतः ४ महिन्यांपासुन आले पिकाच्या कंद वाढीस सुरवात होते. प्रती एकर आल्याचे १२० ते १६० क्विंटल पर्यत उत्पादन मिळते. आले पिका हे वास्तविक एक बहुवार्षिक पिक असुन, त्याची लागवड मात्र वार्षिक पिक म्हणुन केली जाते. अनेक ठिकाणी आले पिकाची व्दिवार्षिक पिक म्हणुन देखिल लागवड केल्याची नोंद आहे.