logo

शेवगा | DrumStick लागवड पध्दती

जमिन व हवामान

शेवगा पिकाची लागवड हि उष्ण व समशितोष्ण अशा दोन्ही हवामानात केलेली चांगली ठरते. या पिकास जास्त तापमान आणि अती कमी तापमान सहन होत नाही. जमिन भुसभशीत आणि सेंद्रिय पदार्थ युक्त अशी असावी. ज्या जमिनीते क्ले (clay) चे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीत लागवड शक्यतो करु नये, पाणी धरुन ठेवणारी जमिन पिकांस मानवत नाही. २५ ते ३० डि.से. तापमान पिकाच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते.

कमी पाण्यात येणारे हे पिक, पाणी मिळाल्यास फुलो-यावर येण्यास उत्सुक असते. तापमान ४० डि. से. पेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होते, आणि रात्रीचे तापमान १६ डि.से. पेक्षा कमी झाल्यास फळ धारणा होत नाही. शेवगा ४८ डि.से. तापमानत देखिल तग धरु शकतो.

लागवड पध्दती

शेवगा पिकाची लागवड बीयांपासुन तसेच काड्यांपासुन केली जाते. काड्यांपासुन केली जाणारी लागवड हि बहुवार्षिक शेवग्याची केली जाते, वार्षिक शेवग्याची लागवड हि बियांपासुन करतात. साधारणतः १० ग्रॅम वजनात ३५ बिया असतात. (प्रती बी साधारणतः ०.२८८ ग्रॅम वजन). १ एकर क्षेत्रात लागवडी करिता २५० ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. (जवळपास एकुण ८७५ बिया, एक एकर क्षेत्रात २.५ x २.५ मीटर अंतरावर लागवड केल्यास ६४० रोप बसते.)

बेड तयार करुन किंवा प्लास्टिक पिशव्या भरुन रोपांची निर्मिती केली जाते. बी लागवडी नंतर साधारणतः ३० दिवसांत रोप पुर्नलागवडीसाठी तयार होते. पिशवीत बीयांची लागवड ही २ से.मी. खोलीवर करावी. त्यात पिशवी भरण्यासाठी गाळ, माती, तसेच पुर्णपणे कुजलेले शेणखत किंवा त्याहुन अधिक उत्तम असे निंबोळी पेंड चा वापर करता येईल.

शेवगा पिकाची लागवड पाऊस पडल्यानंतर करावी, पाण्याची उपलब्धता असेल तर जुन-जुलै महिन्यात पाऊस वेळेवर नाही आला तरी लागवड केलेली चालते. उन्हाळ्यात आणि जास्त थंडीत लागवड करु नये.

साधारणतः महिन्यातुन एकदा पाणी दिले तरी हे पिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिप ईरिगेशन असेल तर एका रोपाला शेवगा पिकाची २.५ x २.५ मीटर वर लागवड केल्यास एकरी ६४० रोप बसते. (१६०० रोप प्रती हेक्टर) लागवड करण्यापुर्वी ४५ x ४५ x ४५ से.मी. आकाराचे खड्डे घेवुन त्यात शेणखत, गांडुळ खत, मॅन्कोझेब, सिंगल सुपर फॉस्फेट मातीत टाकुन त्यानंतर खड्डे भरुन लागवड करावी.

शेवगा लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी त्याचा वाढणारा शेंडा खुडल्यास जास्त प्रमाणात फांद्या मिळुन फळांची संख्या वाढविण्यात मदत मिळते. ६० ते ७५ दिवसांत केलेल्या शेंडा खुडणे या क्रियेमुळे जास्तीत जास्त फांद्या मिळतात, त्यानंतर केलेल्या अशा प्रक्रियेमुळे मात्र हव्या त्या प्रमाणात जास्त फांद्या मिळत नाहीत. एका रोपास ६ ते १० फांद्या ठेवणे फायदेशीर ठरते.

खोलवर जाणारे सोटमुळ, कमीत कमी अशा संख्येत असणा-या जमिनीस समांतर लांब जाणा-या मुळ्या (Lateral roots) आणि जमिनीवर पडणारी अल्प अशी सावली यामुळे शेवगा हे पिक उत्तम आंतरपिक म्हणुन योग्य ठरते. शिवाय शेवगा पिकाच्या जमिनीवर पडणा-या पानांमुळे नविन लागवड होणा-या पिकावरिल पिथियम रोगाचे देखिल नियंत्रण होण्यास मदत मिळते.

शेवग्याची छाटणी केल्यानंतर त्याच्या फांद्या पाने जमिनीवर नैसर्गिक आच्छादन म्हणुन टाकली जातात. अशा प्रकारच्या नैसर्गिक आच्छादनामुळे जमिनीची धुप थांबविण्यात मदत मिळते, पाणी बाष्पीभवनाव्दारे उडुन जाण्याचे प्रमाण कमी होते आणि कालांतराने जमिनीत नैसर्गिक असे सेंद्रिय खत देखिल मिसळले जाते.

शेवगा पिक बहुतेक वेळेस मिरची, वांगी, कांदा, गवार, पिकात आंतरपिक म्हणुन दक्षिणे कडिल राज्यात घेतले जाते. गुजरात राज्यातील वडोदरा, अहमदाबाद तसेच काही इतर भागात शेवगा हे पिक बरेच ठिकाणी बांधावरिल पिक म्हणुन एक अतिरिक्त उत्पादन देणारे पिक आहे.

फुलोरा आणि फळ धारणा

शेवगा पिकांस अनेक वेळेस वर्षभर फुले येत राहतात. परंतु प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि एप्रिल ते मे या काळात आर्थिक फायदा मिळवुन देतील ईतकी फुले जास्त प्रमाणात मिळतात.

फुल उमलल्यानंतर परागकण सकाळी ९ ते १० आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ यावळेत जास्त सक्रिय असतात. शेवगा पिकांत परागीभवन क्रियेत मदत करणारे घटक जसे मधमाशी उपलब्ध असल्यास फळ धारणा हि एकुण फुलांच्या ६४ ते ६८ टक्के ईतकी असते, तर मधमाशांच्या अनुपस्थितीत फळ धारणा केवळ ४२ ते ४७ टक्के ईतकी असते. म्हणजेच एकंदर ५० टक्के उत्पादन हे केवळ मधमाशांच्या उपस्थितीत वाढते. जे शेतकरी मधमाशा पालन आणि सोबत शेवगा लागवड करु ईच्छितात त्यांनी २० ते २५ शेवगा रोपांच्या साठी एक मधमाशांचे लाकडी बॉक्स ठेवण्यास हरकत नाही.

फुल उमलल्या नंतर ६५ ते ७५ दिवसांत फळ जास्तीत जास्त लांबी आणि वजन प्राप्त करते.

शेवगा पिकात फळ काढणीनंतर रोप जमिनीपासुन साधरणतः १ मीटर अंतरावर कापुन टाकतात, जेणे करुन नवीन फुट येवुन त्यावर हवामानानुसार ४ ते ६ महिन्यात पुन्हा फळधारणा होते. तसेच फळे हाताने काढता येतिल अशा उंचीवर रोपाची वाढ होते.