logo

header-ad
header-ad

फ्युजॅरियम विल्ट

फ्युजॅरियम विल्ट
फ्युजॅरियम विल्ट

फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरम ह्या बुरशीमुळे कापुस पिकात मर रोग होतो. हि बुरशी मातीतच असते. एकदा रोग मातीत स्थिर झाली की १० वर्षांपर्यंत मातीत राहु शकतो. पिकास देण्यात येणा-या पाण्याच्या मात्रेत अचानक तफवात झाल्यास रोगाची बुरशी मुळांवर हल्ला करण्याची सर्वाधिक शक्यता असते. रोपांवर तणाव असल्यास रोप रोगास चटकन बळी पडते.

रोपांवर असलेल्या तणावात पाण्याची कमतरता, जास्त पाणी, अन्नद्रव्यांची कमतरता, तापमानाचा ताण, आर्द्रता,रोगांचा किंवा किडीचा हल्ला ह्या आणि ईतरही अनेक घटकांचा समावेश होतो. फ्युजॅरियम मुळे होणारी मर ही थंड वातावरणात लवकर दिसुन येते, उष्ण वातावरणात जेव्हा तापमान २८ डि.से. पेक्षा जास्त असते त्यावेळेस पिकावरिल लक्षणे हि लवकर दिसुन येत नाहीत.

रोगाचा मध्यम ते मोठ्या प्रमाणावर हल्ला झाल्यानंतर आर्थिक दृष्ट्या होणारे पिकाचे नुकसान भरुन काढेल असा कोणताही नियंत्रणाचा पर्याय ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी उपलब्ध नाही. ह्या रोगाची बुरशी ही शेतातील वाहनांचे टायर, शेतात वापरली जाणारी अवजारे, रोगट बीज, माती, पाणी, वारा ह्यांच्या व्दारे वाहुन नेले जात असल्या कारणाने, रोग मोठ्या प्रमाणावर प्रसार पावण्याची क्षमता बाळगुन असतो.

रोगाची लागण हि शेतात विखुरलेली असते. शेतातील कोणताही एकच पुर्ण पट्टा हा सहसा रोगग्रस्त होत नाही. शेतात ठिकठिकाणी रोप मेलेले दिसुन येते. रोगाचा प्रसार हा ज्या दिशेने पाणी वाहते त्या दिशेने होत असतो. रोगग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात. हि पिवळी पाने नंतर तपकीरी रंगाची होवुन गळुन जातात. रोगग्रस्त रोपेच खोड उभे चिरले असता त्यात तपकिरी, चॉकलेटी रंगाचे पट्टे किंवा पुर्ण खोड आतुन अशा रंगाचे झालेले दिसुन येते.

नियंत्रण

कापुस पिकात ह्या रोगाची लागण हि हमखास होतच असते, असे गृहीत धरुन, पिक लागवडीपुर्वी ब्लिचिंग पावडर २ ते ३ किलो प्रती एकर ह्या प्रमाणात पेरणीच्या ५ ते ७ दिवस आधी ड्रिप मधुन द्यावे.

शेतात पुर्णतः कुजलेल शेणखतच वापरावे. अर्धवट कुजलेल्या शेणखताचा वापर करु नये.

शेतातील वाहनांच्या टायरला शेतातील माती लागुन दुस-या शेतात जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. त्याच प्रमाणे मजुरांच्या बुटांना, चपलेला देखिल माती चिकटुन जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

शेतातील तण नियंत्रण हे रोप उगवणीनंतर अती जलद करुन घ्यावे. कापुस पिकातील अनेक तणांच्या मुळांवर देखिल हि बुरशी आढळुन येते. ह्या तणांच्या मुळांत तसेच खोडात देखिल हि बुरशी आढळुन येते, ह्या तणांवर बुरशी कोठल्याही प्रकारची लक्षणे दाखवत नाही. त्यामुळे योग्य वेळी केलेले तण नियंत्रण अत्यंत महत्वाचे आहे.

पिकास उगवणीनंतर १० ते १५ दिवसांत झिंक सल्फेट १० किलो आणि फेरस सल्फेट ५ किलो प्रती एकर ह्या प्रमाणात द्यावे. झिंक कमतरता असलेल्या मातीत आणि रोपांवर मर रोग त्वरीत हल्ला करतो. त्यामुळे शेतात झिंक ची कमतरता असु नये ह्याची काळजी घ्यावी. ह्या वेळेस पिकास चिलेटेड झिकं आणि फेरस चा वापर करु नये.

रोप उगवणीनंतर लागलीच पिकास ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर जमिनीतुन करावा. ट्रायकोडर्मा बुरशी मुळांच्यावर कवच तयार करुन रोगापासुन रक्षण करण्यास मदत करते. ट्रायकोडर्माचा उशीरा केलेला वापर हा रोगापासुन रक्षण मिळवुन देण्यात अपयशी ठरतो. रोपांवर स्थिर झालेल्या बुरशीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलस ह्या जीवाणू चा जमिनीतुन वापर करावा.

शेतात रोगाचे प्रमाण वाढल्यास (साधरणतः १० ते १५ टक्के पेक्षा जास्त) मॅन्कोझेब २५० ग्रॅम आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड २५० ग्रॅम हे २०० लिटर पाण्यात २० ते ३० मिनीट एकत्र करुन ठेवावे. त्यानंतर हे द्रावण ड्रिप ने शेतात सोडावे अथवा ड्रेचिंग करावी. त्या सोबतच, जितकी रोपे मरुन गेली आहेत त्या रोपांना पुन्हा नव्याने हेच द्रावण मुळांपाशी द्यावे, तसेच मेलेल्या रोपांच्या ५ फुट परिघातील ईतर निरोगी रोपांना देखिल अशाच प्रकारे मुळांजवळ द्रावण टाकुन ट्रिटमेंट करावी. रोगाचा प्रार्दुभाव जास्त असल्यास सदरिल ट्रिटमेंट २ किंवा ३ वेळेस करावी लागु शकते.

पिकास पाणी देतांना नियमितता पाळावी. तसेच भरपुर पाऊस झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्यास ३ ते ५ दिवसांच्या पेक्षा कोरडा काळ आल्यास आणि पिकास पाणी देण्याची सोय नसल्यास रोगाची लागण होते त्यामुळे अशा परिस्थितीत कॉपर आणि मॅन्कोझेब ची वरिल प्रमाणे ट्रिटमेंट करावी.

पिकावर मेटालॅक्झिल, बावीस्टिन, ट्रायसायक्लाझोल ह्या पैकी एकाची प्रतिबंधकात्मक फवारणी रोप उगवणीनंतर १० ते १५ दिवसांच्या आत घ्यावी.