logo

Bacterial Wilt | बॅक्टेरियल विल्ट

Ralstonia solanacearum

कशामुळे होतो

(Ralstonia solanacearum) राल्सोटिया ह्या जीवाणू मुळे टोमॅटो, वांगी, मिरची आदी सोलेनीस परिवारातील पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. सोलेनीस परिवारीच्या व्यतिरिक्त २०० प्रकारच्या वनस्पती आणि २० प्रकारच्या वनस्पती परिवारांच्या मुळांवर हल्ला करण्यास हा जीवाणू सक्षम आहे. ह्या रोगाच्या वाढीसाठी २६ ते ३२ डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते. रोगाचा प्रसार हा पाण्याव्दारे तसेच मातीव्दारे होतो. हा जीवाणू अनेक दिवसांपर्यंत प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष, तसेच ज्या शेतात प्रादुर्भाव झालेला आहे, त्या शेतातील पाण्यात देखिल सुप्तावस्थेत राहु शकतो.

जास्त तापमान आणि ९५ टक्क्यांपेक्षा कमी ची आर्द्रता रोगासाठी काही प्रमाणात हानीकारक ठरते. रोगाची लागण ही, मुळांच्या व्दारा, तसेच काही प्रमाणात खोडावर इजा झालेली असल्यास त्या व्दारे देखिल होते. वा-या व्दारे प्रसार होत नाही. प्रादुर्भाव ग्रस्त रोपांकडुन निरोगी रोपांनी लागण ही पाण्याव्दारे, शेतीची मशागत करण्यासाठी केल्या गेलेल्या कामांमुळे देखिल होते.

Bacterial Wilt
Bacterial Wilt
Bacterial Wilt
Bacterial Wilt

रोगाची लक्षणे

रोगाच्या सुरवातीच्या लक्षणांत, दिवसाच्या जास्त तापमानाच्या कालखंडात, रोपाची पाने देठाकडुन खाली वाकलेली किंवा मलुल झालेली दिसुन येतात, संध्याकाळ होता होता, ही पाने पुन्हा ताजीतवानी दिसतात. शेतात हा रोग एकाच ठिकाणी वाढत नाही, तर तो शेतात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या पध्दतीने वाढलेला दिसुन येतो.

रोगाची लागण झालेल्या रोपांची पाने हिरवी असतांनाच मरुन जातात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या रोपाच्या खोडांच्या तसेच मुळांच्या आतील रंग हा हलका तपकिरी होतो. खोड, किंवा मुळ आडवे चिरले असता, त्यातुन काही वेळेस चिकट पदार्थ स्रवतांनी दिसतो, तसेच असे चिरलेले खोड स्वच्छ पाण्यात बुडवुन बघितले असता त्यातुन पांढ-या रंगाचा स्राव वाहतांना दिसुन येतो.

नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणात प्रतिबंधकात्मक उपाययोजना फायदेशीर ठरते. रोपांस ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांची बीज प्रक्रिया करावी. रोगाची लागण जास्त प्रमाणात होण्यात मातीतील झिंक ची कमतरता देखिल कारणीभुत ठरते, त्या अनुशंगाने माती परिक्षण करुन झिंक चा वापर करावा. रोगाची लागण होण्यात, पिकास दिल्या जाणा-या पाण्याच्या प्रमाणात अचानक झालेला बदल देखिल महत्वाची भूमिका पार पाडतो, त्यामुळे पिकास वाफसा स्थिती राहील अशा पध्दतीने पाणी द्यावे, पाण्याच्या मात्रेत अचानक मोठा बदल करु नये. रोगाची लागण झाल्यानंतर बॅसिलस सबटिलस चा वापर करता येईल.