logo

केळी | उन्हाळ्यात घडाची काळजी आवश्‍यक

पाणी व्यवस्थापन

दुष्काळी क्षेत्रात, तसेच पाण्याची कमतरता असलेल्या भागात केळीला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. या पद्धतीत प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीच्या 25 ते 30 टक्के पाणी लागते. तसेच उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ मिळते.

पाणी व्यवस्थापन

आच्छादनाचा वापर:

पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी जमिनीवर दोन ओळींमध्ये आच्छादन पसरावे. त्यासाठी गव्हाचा भुस्सा, उसाचे पाचट, केळीची खराब कापलेली पाने वापरावीत. त्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच तणांचा बंदोबस्त होऊन आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते.

उन्हाळी लागवड करण्यापूर्वी

जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करावी. रोपे लागवडीच्या 10 ते 15 दिवस आधी त्या जमिनीमध्ये ताग किंवा धैंचा पेरावा. त्यामुळे रोपे लागवड करताना गारवा राहील. नवीन रोपांचे उष्णतेपासून संरक्षण होईल.

बाष्पनिरोधकांची फवारणी

केळीच्या पानाद्वारे मोठ्या प्रमाणात वातावरणात पाणी फेकले जाते. त्यासाठी केओलीन आठ टक्के द्रावणाची फवारणी केल्यास पर्णोत्सर्जन कमी होऊन पाण्याची बचत होते.

उष्ण वाऱ्यांपासून बागेचे संरक्षण

अति तापमानामुळे उन्हाळ्यात गरम वारे वाहते, त्यामुळे बागेतील तापमान वाढते. तसेच वाऱ्यामुळे पाने फाटून मोठे नुकसान होते. त्यासाठी बागेचे वाऱ्यापासून संरक्षण करणे आवश्‍यक असते. त्यासाठी लागवडीच्या वेळेस बागेच्या चारही बाजूने शेवरीची लागवड करावी किंवा उसाच्या तीन ते चार ओळी दाट लावाव्यात. त्यामुळे गरम वाऱ्यापासून बागेचे संरक्षण होते. असे काही केले नसल्यास गवताची सहा-सात फूट उंचीची ताटी पिकाच्या चारही बाजूने लावावी, त्यामुळे बागेत आर्द्रता वाढून गारवा वाढतो.

घडांची काळजी

उन्हाळ्यात गरम हवा तसेच पाण्याची असमानता यामुळे घड बुंध्यापासून सटकतात. तसेच जास्त उन्हामुळे घडाच्या दांड्यांवर काळे चट्टे निर्माण होतात. त्या जागी दांडा मोडून किंवा सटकून मोठे नुकसान होते. त्यासाठी केळीच्या पानांच्या साहाय्याने घड झाकावेत. उरलेल्या पाण्याची पेंडी करून घडाच्या दांड्यावर ठेवावे व उन्हापासून घडाचे संरक्षण करावे. जमिनीत वाफसा स्थिती ठेवावी किंवा 80 ते 90 टक्‍क्‍यांची ग्रीनशेड जाळीचे कापड घेऊन त्याने घड झाकावेत. जेणेकरून घडावर तीव्र उन्हाचा परिणाम होणार नाही. जास्त तापमानाच्या कालावधीत केळी पिकात वाफसा राहिल्यास बागेतील तापमान कमी राहते. त्याकरिता शक्‍यतो सकाळी लवकर दोन तास ठिबक चालू ठेवावे व संध्याकाळी दोन तास चालू ठेवावे. जेणेकरून बागेत वाफसा राहील.

केळी घडावर फुलकिडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व केळी फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी केळफूल बाहेर पडते वेळी केळफूल व पानांच्या बोचक्‍यात ऍसीटॅमीप्रीड 1.5 ग्रॅम सोबत 10 मिली उत्तम प्रतीचे स्टीकर 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने साध्या फवारणी यंत्राने दोन फवारण्या कराव्यात व त्यानंतर केळी घड 6 टक्के सच्छिद्रता असलेल्या 100 गेज जाडीच्या प्लॅस्टिक पिशवीने झाकावा.