केळी बागेतील नुकसानीचे प्रकार
- ◉ केळी झाडांची पाने फाटणे, नवीन येणाऱ्या पानांस इजा होणे.
- ◉ वाढीच्या अवस्थेत असलेल्या घडावर गारपिटीच्या माऱ्यामुळे खोलवर खड्डे पडणे, डाग पडणे.
- ◉ खोडावर इजा होणे.
- ◉ झाडे पूर्णपणे उन्मळून पडणे.
- ◉ गारपिटीमुळे झालेल्या जखमांवर रोगराईचा प्रादुर्भाव होणे.
अशा स्थितीत केळी बागांमध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात
- ◉ पूर्णपणे उन्मळून पडलेली झाडे बागेबाहेर काढावीत.
- ◉ विक्रीयोग्य घडाची त्वरित कापणी करून विक्री करावी.
- ◉ घडातील इजा झालेल्या केळीचे प्रमाण कमी असेल तर अशी केळी काढून घ्याव्यात.
- ◉ वाकलेल्या झाडांना आधार द्यावा.
- ◉ सहा महिने वयाच्या झाडांची पाने पूर्णपणे फाटली असल्यास, अशी झाडे कापून बागेबाहेर काढून टाकावीत.
- ◉ घड निसवण होऊन दोन महिने झालेल्या झाडांची पाने पूर्ण फाटून गेली असली तरी अशा घडांना पक्वतेसाठी फक्त पाण्याची गरज असते. अशा झाडांचे पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे.
- ◉ न निसवलेल्या झाडांची पाने पूर्ण फाटून गेली असल्यास, अशा झाडांचे चार किंवा त्यापेक्षा जास्त पाने फुटण्याची वाट पाहावी. त्यासाठी झाडांचे व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करावे. असे करूनही जर चार पाने फुटली नाहीत तर अशी झाडे काढून टाकावीत.
- ◉ जर पूर्ण बागेची पाने फाटून गेली असल्यास, अशा झाडांचा योग्य पोषण करून नवीन जोमदार फुटवे वाढवून पहिले खोडवा पीक घेता येऊ शकते.
- ◉ गारपिटीमुळे झाडाच्या पानांवर, खोडावर तसेच घडावर झालेल्या जखमांवर बुरशीजन्य रोगांचा दुय्यम प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी झाडांवर कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी घ्यावी.
- ◉ केळी पिकावर सिगाटोका लीफ स्पॉट रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, या करिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बागेत मॅंकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची उदा. प्रोपीकोनॅझोल 10 मि.लि. प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी.
- ◉ बागेचे सातत्याने निरीक्षण करावे.
- ◉ कोवळ्या नुकसानग्रस्त घडाचा वापर पशुखाद्य म्हणून करता येईल.