
Banana Plantation / लागवड पध्दती
केळी लागवड करतांना परिसरातील करपा (सिगाटोका) रोगाच्या लागणीच्या अनुभवानुसार योग्य अंतरावर लागवड करावी. खालिल तक्त्यात केळी पिकांच्या लागवड अंतरानुसार किती रोप बसतिल या बाबत आकडे दिलेले आहेत.
रोपांतील अंतर | ओळींतील अंतर | प्रती हेक्टर रोपांची संख्या | प्रती एकर रोपांची संख्या | ||
मीटर | फुट | मीटर | फुट | ||
1.5 | 5 | 1.5 | 5 | 4444 | 1778 |
1.8 | 6 | 1.8 | 6 | 3086 | 1235 |
1.5 | 5 | 1.8 | 6 | 3704 | 1481 |
1.65 | 5.5 | 2.1 | 7 | 2886 | 1154 |
1.65 | 5.5 | 1.8 | 6 | 3367 | 1347 |
1.2 | 4 | 1.8 | 6 | 4630 | 1852 |
![]() |
केळी लागवडीचा हंगाम -
मृग बहार (खरीप) - जुन - जुलै मध्ये लागवड करतात.
कांदे बहार (रब्बी) - ओक्टोंबर - नोव्हेंबर मध्ये लागवड करतात.
जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्ये केलेंडर लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळते. या लागवडी मुळे केळी 18 महिन्याऐवजी 15 महिन्यात काढणे योग्य होतात.
लागवडी योग्य जमिन
केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्त अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवते. क्षारयुक्त जमिनी मात्र केळी लागवडीस उपयुक्त नाहीत.
केळीची मुळे फार खोलवर जात नसल्याने मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत देखील लागवड करता येते. कमी खोलीच्या जमिनीतून चांगले उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्याचा भरपूर पुरवठा करणे गरजेचे असते, त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. खारवट जमिनी केळीला चालत नाहीत. क्षारांचे शेकडा प्रमाण ८.०५ च्या वर गेलेल्या जमिनी केळी लागवडीस अयोग्य आहेत. जमिनीतील थोड्या प्रमाणातील चुनखडी केळीला उपयुक्त ठरते.
लागवड पध्दत
कंदांची निवड
कंद निवडीसाठी मागील वर्षीच्या मृगबागा प्रत्यक्ष जाऊन पाहाव्यात. जातिवंत, निरोगी बागांमधील अधिक उत्पादन देणारे मातृवृक्ष निवडावेत आणि या मातृवृक्षांचे कंदच लागवडीसाठी वापरावेत. वांझ झाडांचे मुनवे वापरू नयेत. तीन ते चार महिने वयाचे, तलवारीच्या पात्याप्रमाणे पाने असणारे, ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे, उभट किंवा नारळाच्या आकाराचे, दहा ते १४ रिंगा असणारे कीड व रोगमुक्त कंद लागवडीस निवडावेत.
कंदप्रक्रियाकंद काढून ते शेतात आणल्यानंतर कंदांवरील माती, मुळ्या; तसेच डोळे धारदार विळीच्या साह्याने तासावेत. वरील तीन ते चार रिंगा सोडून एक सें.मी. खोलीपर्यंतची साल काढावी. भौतिक संस्कार केलेले हे कंद बेणे लागवडीपूर्वी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझीम + १५० ग्रॅम ऍसिफेटच्या द्रावणात ३० मिनिटे बुडवावेत. यामुळे कंदांवरील सूत्रकृमी व बुरशी नष्ट होऊन प्रादुर्भावाची तीव्रता कमी होते.
उतिसंवर्धित रोपेउतिसंवर्धित रोपे खात्रीशीर नर्सरीतूनच विकत घ्यावीत. रोपे सरळ वाढणारी, ३०-४५ सें.मी. उंचीची, पाच ते सात चांगली पाने असणारी, कोणत्याही रोग वा किडींचा प्रादुर्भाव नसलेली असावीत. लागवडीपूर्वी पाच-सहा दिवस आधी रोपे नर्सरीतून आणून शेतात झाडाखाली अर्धसावलीत ठेवावीत. त्यांना झारीने पाणी द्यावे. प्रत्येक रोपास बुरशीनाशक + जिवाणूनाशक द्रावणाची १०० मि.लि. आळवणी करावी. रोपांना फवारणीद्वारे अन्नद्रव्ये द्यावीत. पाच ते सहा दिवस स्थिरावल्यानंतर यातील मोडलेली रोपे बाजूला काढावीत, तसेच रोपांवरील रोगट पाने कापून घ्यावीत. रोपे आणताना आवश्यकतेपेक्षा पाच टक्के रोपे जास्त आणावीत. ही रोपे नांग्या भरण्यासाठी उपयोगी पडतात.
केळी पिकाच्या वाढीच्या अवस्था –
अुन.क्र. | वाढीचा काळ | दिवस |
1. | सुरवातीची वाढ | 0-30 दिवस |
2. | शाकिय वाढीचा काळ | 30-60 दिवस |
3. | महत्वाच्या वाढीचा काळ | 60-90 दिवस |
4. | सुप्तावस्थेत घड तयार होण्याचा काळ | 90-120 दिवस |
5. | निसवणीचा काळ | 180-240 दिवस |
![]() |
केळी पिकास लागवडीपुर्वी 1 एकर क्षेत्रात ५ ते १० बैलगाडया कुजलेले शेणखत, ५०० किलो निंबोळी पेंड तसेच ५०० किलो गांडुळ खत घालावे. त्यासोबतच २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. लागवड करण्यापुर्वी जमिनीत थायमेट एकरी १० किलो, व मॅन्कोझेब ५०० ग्रॅम ते १ किलो टाकावे. तसेच जर बेण्यापासुन लागवड होणार असेल तर २०० लिटर पाण्यातुन ५०० मिली क्लोरोपायरीफॉस, ५०० ग्रॅम मॅन्कोझेब व २५० ग्रॅम बाविस्टीन तसेच २०० ग्रॅम पोटॅशियम ह्युमेट ग्रॅन्यअल्स, व १०० ग्रॅम सिलीका च्या द्रवाणात १००० खोड ५ मिनीट बुडवुन मग लागवड करावी.
फळधारण व हंगाम
लागवडीनंतर 10 ते 12 महिन्याच्या अवधित झाडावर लॉगर येऊ शकतो. बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्यात बाहेर पडतात. वाल्हा जातीत 6 ते 7 महिने लागतात. लालवेची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात. तर लालकेळीस लॉंगर येण्यास 14 महिने लागतात. झाड चांगले वाढलेले असल्यास लागवडीनंतर साधारणपणे 6 महिन्यांनी खोडास फुलोरा तयार होवू लागतो. व 9 ते 10 महिन्यांनी केळी फूल खोडाबाहेर पडते. व 3 ते 5 महिन्यात घड तयार होतो. थंडीच्या दिवसात घड तयार होण्यास जास्त काळ लागतो. घडाने आकार घेतल्यानंतर त्याच्या टोकास असलेले वांझ केळफूल त्या घडातील केळयांच्या शेजारी फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकतात. वांझ केळफूल ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्याचे वजन वाढते.
केळीचा हंगाम मुख्यतः महाराष्ट्रात ठाणे, वसई भागात जूलै ते मार्च व खानदेश भागात सप्टेंबरमध्ये असतो. फळ चांगले पोसून गुबगुबित झाले, त्यावरच्या धारा (कडा) मोडून ते गरगरित झाले की, ते पूर्ण तयार झाले समजावे. पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पिकतो. त्यामुळे तो वाहतूकीस योग्य ठरतो. त्यासाठी 75 टक्के पक्व असेच घड काढतात. त्यामुळे ते लांबवर वाहतूक करता येते.
बागेची निगा
- 1) बागेतील जमिन स्वच्छ व भुसभुशित ठेवावी. त्याकरिता सुरुवातील कोळपण्या द्याव्यात. पुढे हाताने चाळणी करावी.
- 2) केळीच्या बुंध्यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्या वेळी काढून टाकावीत.
- 3) लागवडीनंतर 4 ते 5 महिन्याने झाडांच्या खोडाभोवती मातीवर थर द्यावा.
- 4) आवश्यकता भासल्यास घड पडल्यावर झाडास आधार द्यावा.
- 5) सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्हणून केळीच्या घडाभोवती त्याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळण्याची प्रथा आहे.
- 6) थंडीपासून संरक्षणासाठी बगीच्याच्या भोवताली शेकोटया पेटवून धूर करावा.
- 7) केळी पिकाला इतर फळपिकांच्या मानाने जास्त पाणी लागते. दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे व त्यामुळे पाणी पातळी खोलवर जात आहे. त्यामुळे केळी खाजलील क्षेत्र कमी कमी होत आहे. क्षेत्र वाढीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबकसिंचन योजना राबवून क्षेत्र टिकवून राहू शकेल व त्यात वाढही शक्य आहे.
- 8) केळी हे सर्व फळांमध्ये स्वस्त आहे व त्यामुळे गरीबवर्गीयांसाठी उपयुक्त आहे. या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी विशेष शासकीय सवलतीचा कार्यक्रम नाही. इतर जिरायत व बागायत पिकांप्रमाणे कर्जपुरवठा वगैरे उपलब्ध केला जातो. वाहतूकीसाठी रेल्वेकडून वॅगन्स उपलब्ध केल्या जातात. पण त्यात अल्पशी सवलत आहे. केळी उत्पादन टिकविणे, वाहतूक जलद व सवलतीच्या दराने करणेची व्यवस्था करणे यामुळे लागवड क्षेत्र वाढीवर चांगला परिणाम होईल.
आंतरपिके
केळीत घ्यावयाच्या मिश्र पिकांची निवड करतांना मुख्य पिकातील अंतर, अन्नद्रव्याचा पुरवठा मशागतीच्या पध्दती पिकांवर पडणारे रोग व किड पाणीपुरवठा वगैरे बाबींचा प्रामुख्याने विचार करणे अगत्याचे ठरते. जळगांव भागातील शेतकरी सुरुवातीला मिश्र पिक घेत नाहीत. परंतु पिक 16 ते 17 महिन्याने झाल्यावर आणि बागेतील 85 ते 90 टक्के घड कापले गेल्यावर केळीच्या बागेत गहू हरबरा सारखी रब्बी हंगामातील पिके घेतात. अथवा कांद्याचे बियाण्यासाठी कांदे लावतात. कोकण किनारपटटीत नारळ पोफळीच्या बागेत केळीची पिके लावतात.