logo

Banana Crop Management / पिक व्यवस्थापन

आंतर मशागत व तण नियंत्रण

केळी लागवडीनंतर शेत भुसभुशीत रहावे म्हणून तीन महिन्यापर्यंत कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. मुळांना इजा होणार नाही अशाप्रकारे आंतरमशागत करावी. माती भुसभुशीत करून झाडाला भर लावावी. 3 महिन्यानंतर आंतर मशागत करू नये. वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करावा. लागवड पावसाळयानंतरची असल्यास जास्त वेळा आंतर मशागत करायची गरज नाही.

पिल कापणे

केळी रोपे लागवडीपासून तिसऱ्या महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात मुख्य खोडाच्या बाजूला पिलांची निर्मिती होते. ही पिले वेळोवेळी कापली नाहीत तर मुख्य पिकला स्पर्धा करतात व अन्नद्रव्याचा ऱ्हास करतात. त्यासाठी अशी पिले विळ्याच्या सहाय्याने कापत रहावीत. यासाठी कुठल्याही तणनाशकाचा उपयोग करू नये. त्यामुळे केळीच्या कंदाला इजा होऊन रोग व किडींना आमंत्रण मिळते.

पाने व केळफूल कापणे

जसजशी झाडाची वाढ जोमाने होते तसे नवीन पाने येण्याचे प्रमाण वाढते. सर्वसाधारणपणे दर महिन्याला ४ ते ५ नवीन पाने येतात. तेव्हा जुनी व खालची पाने पिवळी होऊन सुकतात. ती पिवळी किंवा सुकलेली पाने कापून शेताच्या बाहेर नेउन टाकावीत किंवा कंपोष्ट खड्ड्यात घालावीत. परंतु कुठलेही हिरवे पान कापू नये. केळफूल बाहेर पडायच्या आधी झाडवर कमीत कमी १५ ते १६ कार्यक्षम पाने असावीत. केळी वाढीच्या काळात कमीत कमी १० ते १२ पाने झाडावर असावीत याची काळजी घ्यावी.

केळफूल बाहेर पडल्यानंतर जेव्हा सर्व कळ्या मोकळ्या होतात. त्यानंतर लहान फुलफणी निघतात अशा दोन फुलफण्या बाहेर पडल्यानंतर केळफूल कापावे. त्यात विलंब झाल्यास घडाच्या भरणीवर विपरीत परिणाम होतो.

झाडाला आधार देणे

टिश्यू कल्चर केळीची घडाचे सरासरी वजन २५ ते ३५ किलोच्या दरम्यान असल्याने वजनाने झाडे झुकतात किंवा सोयाट्याचा वारा आल्यानंतर मोडतात. म्हणून झाडाला बांबूचा आधार द्यावा.

केळी घड झाकणे

केळीचा घड बाहेर पडल्यानंतर घडाच्या दांड्याचे उष्ण सुर्यप्रकाशापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केळीच्या वाळलेल्या पानांचे पेंढी करून ते घडांच्या दांड्यावर पानांमध्ये अडकवून दांडा आणि घडांचे उष्ण तापमान हवामानापासून संरक्षण होईल. अन्यथा दांड्यावर प्रखर उन्हामुळे काळा डाग पडतो व दांडा सडून घड गळून पडतो.

केळी निर्यात करायची असल्यास किंवा ज्या परिसरात बनाना रेड ईस्ट थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव असल्यास ५ मायक्रॉन गेजच्या बॅगेला क्षेत्राच्या १० % हिस्सा होईल अशा प्रकारे ४ ते ५ मी. मी. आकाराचे छिद्र पाडावे व ती बॅग घडावर घालून संरक्षण करावे.

खोडव्यांसाठी पिलाची निवड करणे

सर्व साधारणपणे ७५ ते ८० % केळफूल बाहेर पडल्यानंतर किंवा पहिली कापणी सुरू झाल्यानंतर घडाच्या विरुद्ध दिशेने, नवीन आलेला, न कापलेला व तलवारीसारखी पाने असलेला आणि खोडाच्या सर्वांत जवळ असलेला एक पील निवडावा व त्याला खोडवा पीक म्हणून त्वरित अन्नद्रव्याची मात्रा द्यायला सुरुवात करवी.

अशाच पद्धतीने निदव्याची पद्धत पण करावी. या पद्धतीने आपणास १२ महिन्यात पहिले पीक आणि २० ते २१ महिन्यात दुसरेपीक आणि २८ ते ३० महिन्यात तिसरे पीक असे एकूण ३० महिन्यात तीन पिके मिळतात.