logo

सलाईन सोडीक (अल्कली) जमिन

या जमिनीत सोडीयम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) आणि सोडीयम कार्बोनेट (कपडे धुण्याचा सोडा) यांचे प्रमाण फार जास्त असते, ज्यामुळे मुक्त अशा एक्सचेंजेबल सोडीयम चे प्रमाण जास्त असते. अशा जमिनींच्या वरिल थरात गर्द रंगाचा क्षारांचा थर जमा होतो ज्यामुळे यांस ब्लॅक अल्कली देखिल संबोधतात. अशा जमिनीत पाणी मुरत नाही, तसेच जमिन कडक होते.

सलाईन सोडीक (अल्कली) जमिन तयार होण्यामागची कारणे

१. नैसर्गिक कारणे- माती ज्या खडकांपासुन तयार झाली त्यात सोडीयम कार्बोनेट (Na₂CO₃)आणि सोडियम बायकार्बोनेट(Na₂HCO₃) चे प्रमाण जास्त असणे.

२. मानव निर्मित – ज्या ठिकाणी औष्णिक वीज प्रकल्प असतो अशा ठिकाणी लाईम स्टोन युक्त कोळसा जाळल्याने त्यापासुन कॅल्शियम ऑक्साईड युक्त राख मिळते. हे कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात विरघळते आणि त्यापासुन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते जे पाणी साठे जसे नदी वै. मध्ये वाहुन नेले जाते. ज्यावेळेस नदी, तलाव, जमिनीतील पाणी यात कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca(OH)₂ अशा प्रकारे टाकले जाते, त्यावेळेस त्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम निघुन जाते. तसेच सोडीयम बायकार्बोनेट चे रुपांतर सोडीयम कार्बोनेट मध्ये करते. हे सोडीयम कार्बोनेट शिल्लक राहीलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वर प्रक्रिया करुन राहीलेली मात्रा देखिल संपवुन सोडीयमचे प्रमाण वाढवते. हि प्रक्रिया कोळसा वापरला जातो अशा सर्वच ठिकाणी राख तयार होवुन होत असते.

३. ज्या उद्योगात सोडीयम चे विविध क्षार वापरले जातात त्यांच्या कडुन देखिल प्रदुषणाच्या स्वरुपात नदी, नाले, व इतर पाणी साठी प्रदुषित होतात.

४. अनेक ठिकाणी पाण्याचा टि.डी.एस. तेवढा काढला जातो. त्यावरुन पाणी हलके होण्यासाठी कोणतीकरी यंत्रणा बसवली जाते जी पाण्यातील क्षार – कॅल्शियम व मॅग्नेशियम काढुन टाकतात व सोडीयम तेवढे शिल्लक ठेवतात. अशा वेळेस हे पाणी जर पिकासाठी सतत वापरले तर जमिनीतील सोडीयम क्षारांचे प्रमाण वाढते.

५. शिवाय जमिनीतील सोडीयम कार्बोनेट हे मुक्त कार्बोनेटस चे प्रमाण वाढवते, ज्यामुळे पाण्यात न विरघळणा-या कॅल्शियम कार्बोनेट चे प्रमाण वाढीस लागते. ह्या मुळे अशा जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होते, व जमिन कडक होते.

ज्या जमिनीत मोन्टेमोरलाईट (काळी जमिन) क्ले असते त्या जमिनीत सोडीयम चे प्रमाण जास्त असणे हे ज्या जमिनीत केओलिनाईट या क्ले चे प्रमाण जास्त असते, याच्या पेक्षा जास्त समस्या निर्माण करते. मोन्टेमोरलाईट ची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही जास्त असते तसेच त्यांची धन आयन्स शोषुन घेण्यासाठीची जागा देखिल जास्त असते त्यामुळे माती कडक होण्याची समस्या वाढते. सलाईन सॉईल मधे सोडीयम सोबत इतर क्षार देखिल असतात ज्यामुळे मातीचे कण फुगण्याची आणि त्यायोगे मातीचा थर कडक होण्याची समस्या कमी होते.

आपण सर्वच जण ग्रॅन्युल्स फार मोठ्या प्रमाणात वापरतो. हे ग्रॅन्युल्स बेन्टोनाईट म्हणुन ओळखले जातात. या बेन्टोनाईट चे सोडीयम एक्सचेंज परसेंटेज (ईएसपी) हे १००% आहे. जमिनीचा ईएसपी हा १० टक्के असणे हि धोक्याची पातळी आहे. त्यामुळे बेन्टोनाईट ग्रॅन्युल्स वापरणे हे किती धोके दायक आहे हे यावरुन लक्षात येते. बेन्टोनाईट पासुन ह्युमिक, अँसिड, सी-विड चे कोटिंग करुन तयार केले जातात, जे प्रामुख्याने ८ ते २० किलो प्रती एकर वापरले जाते. या ग्रॅन्युल्स चा वापर हा मुळांजवळ केला जातो.

अशा जमिनीत सोडीयम क्षारांस सहनशील अशा भात आणि शुगर बीट ची लागवड करता येते. मध्यम स्वरुपात सहनशील अशी गहु, बार्ली, ऊस, ओट देखिल घेता येतिल. मात्र या जमिनीत भुईमुग, चवळी, हरभरा, मका हि पिके घेवु नयेत.