logo

केळी | थंडीच्या काळातील केळी बागेचे व्यवस्थापन

 

  • ◉ मृगबाग व कांदेबाग केळीचे शेत तसेच बांध तणमुक्त ठेवावेत. मुख्य खोडांलगत येणारी नवीन पिल्ले धारदार विळ्याच्या साह्याने जमिनीलगत कापून घ्यावीत.
  • ◉ केळी बागेत विषाणूजन्य रोगांची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ खोदून काढावीत व बागेपासून दूर नेऊन नष्ट करावीत.
  • ◉ बागेत बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यास बागेच्या स्वच्छतेबरोबरच पानांचा रोगग्रस्त भाग किंवा संपूर्ण पान कापावे व बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. संपूर्ण बागेवर प्रति दहा लिटर पाण्यातून 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक 10 मि.लि. स्टिकर यांची फवारणी करावी.
  • ◉ मृगबाग अथवा कांदेबाग केळी बागेत इर्विनिया हेड रॉट या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 200 लिटर पाण्यात 600 मि.लि. क्‍लोरपायरिफॉस + 600 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड + 30 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्‍लीन यांचे एकत्रित द्रावण करून त्याची प्रति झाड 150 मि.लि. या प्रमाणात आळवणी करावी. तसेच, रोगग्रस्त झाडे समूळ उपटून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.
  • ◉ मृगबाग केळी बागेला लागवडीनंतर 165 दिवसांनी द्यावयाची खतमात्रा प्रति झाड 82 ग्रॅम युरिया व 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश कोली करून द्यावी व ही खते लागलीच मातीआड करावीत. फर्टिगेशनद्वारे अन्नद्रव्ये द्यावयाची असल्यास प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा 13 किलोग्रॅम युरिया व 8.5 किलोग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ठिबकद्वारे द्यावे.
  • ◉ मृगबाग केळीची शेवटची टिचणी बांधणी करून झाडांना मातीची अधिकाधिक भर लावावी. या शेतातील ठिबकच्या नळ्या व्यवस्थितपणे अंथराव्यात व बंद झालेल्या नळ्या ऍसिड प्रक्रिया करून स्वच्छ कराव्यात.
  • ◉ नवीन कांदेबाग लागवडीमध्ये लागवडीनंतर 30 दिवसांच्या आत द्यावयाची खतमात्रा 82 ग्रॅम युरिया + 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट + 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड ही रासायनिक खते तसेच प्रति झाड 10 किलो शेणखत अधिक ऍझोस्पिरिलम व पीएसबी ही जिवाणू खते प्रत्येकी 25 ग्रॅम शेणखतात मिसळून बांगडी पद्धतीने पिकास द्यावीत. कांदेबागेस फर्टिगेशन तंत्रज्ञानाने खते देताना एक हजार झाडांसाठी प्रति आठवडा 6.5 किलोग्रॅम युरिया व तीन किलोग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ठिबकद्वारे द्यावे.
  • ◉ जुन्या कांदेबाग केळीचे घड कापल्यानंतर करपाग्रस्त पानांचे अवशेष शेताबाहेर नेऊन नष्ट करावेत, तर इतर वाळलेली पाने व खोड कंपोस्टिंग किंवा आच्छादनासाठी वापरावे.